स्वॅब देण्यासाठी कोरोना संशयित रुग्णांची आता रांगेच्या कटकटीतून सुटका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने आधीच नागरिक भीतीच्या वातावरणात आहेत. त्यात संशयित रुग्णांना स्वॅब देण्यासाठी हेलपाटे मारावे लागत होते. तासनतास उभे राहूनही स्वॅब घेतले जात नव्हते. त्यावर प्रशासनाने पर्याय काढला आहे. त्यामुळे यापुढे अशा नागरिकांना रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही.

औरंगाबाद - कोरोनाबाधित सापडल्यानंतर त्याच्या संपर्कातील लोकांचे त्या वसाहतीमध्ये जाऊन स्वॅब घेतले जात. मग त्यांना स्वॅब देण्यासाठी रांगेत थांबावे लागायचे, मात्र आता यासाठी रांगेत थांबावे लागणार नाही. यापुढे संपर्कातील व्यक्तींना थेट क्वारंटाइन केंद्रात हलवले जाणार असून त्याच ठिकाणी त्यांचे स्वॅब घेतले जाणार आहेत. यामुळे लोक कमीत कमी एकमेकांशी संपर्क ठेवतील. 

काही बदल
शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रशासनावर रोष आहे. तो कमी करण्यासाठी महापालिका प्रशासन आता सरसावले आहे.  कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविताना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाइन करणे, स्वॅब घेणे यांसह विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. आता स्वॅब घेण्याबाबत यंत्रणेकडून काही बदल केले आहेत. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप होणार नाही.

या आवडत्या पक्षापासून माणसांना भिती अॅलर्जी, दम्याची : वाचा....

क्वारंटाईन केंद्रावरच घेणार स्वॅब
महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले, की शहरात कोरोना रुग्णांची संख्या गतीने वाढत आहे. त्यामुळे स्वॅब संकलनाच्या प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार आता प्रत्येक इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन केंद्रावर जाऊनच क्वारंटाइन केलेल्या व्यक्तींचे स्वॅबचे नमुने घेतले जाणार आहेत. त्यामुळे आता कुणालाही स्वॅब देण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही. पूर्वी महापालिकेच्या टास्क फोर्स टीमचे लोक रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधण्यासाठी संबंधित वसाहतीत जाऊन स्वॅब घेत. आता संपर्कातील व्यक्तींना आधी क्वारंटाइन सेंटरवर हलवले जाईल. तेथे त्यांचे स्वॅब घेतले जातील. याबरोबरच प्रशासकीय यंत्रणेला आयुक्तांनी प्रत्येक संशयिताची कोरोना चाचणी करण्याचेही निर्देश दिले आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

चहापाणी-फराळही द्या 
कोविड केअर सेंटरवर स्वॅब देण्यासाठी कुणी आले असेल त्याचे स्वॅब घेण्यासाठी काही वेळ प्रतीक्षा करावी लागली तर तोपर्यंत त्याला चहा किंवा इतर आवश्यक फूड द्या, असेही आयुक्तांनी आरोग्य यंत्रणेला निर्देश दिले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There will be no queuing to give swabs to corona's suspected patients