अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट, केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांची राज्य सरकारवर टीका

प्रकाश बनकर
Monday, 30 November 2020

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नाही. त्यामुळे कोरोना, महिलांवरील अत्याचार, मराठा आरक्षण, शिक्षण आदी प्रश्नांबाबत सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

औरंगाबाद : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नाही. त्यामुळे कोरोना, महिलांवरील अत्याचार, मराठा आरक्षण, शिक्षण आदी प्रश्नांबाबत सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. आपले अपयश झाकण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत असल्याचा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी (ता.२९) येथे पत्रकार परिषदेत केला.

शिक्षणासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावरही हे सरकार गंभीर नाही. शाळा कधी सुरू करायच्या याबाबत ताळमेळ नाही. लोकसेवा आयोगाच्या परीक्षा केव्हा घ्यायच्या याचे उत्तरही सरकारकडे नाही. कोरोनाचाही प्रश्न हाताळण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले. महिलांवर अत्याचाराच्या घटना वर्षभरात वाढल्या. कोविड सेंटरमध्येही अशा घटना घडल्या. कोरोना काळात व्हेंटिलेटर, मास्क आदी साहित्य पुरवूनही केंद्राकडून जीएसटीचे पैसे दिले जात नसल्याचा बोभाटा केला जात आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे. वास्तविक हा राज्य सरकारच्या अखत्यारीतील प्रश्न आहे, असे ते म्हणाले.
राज्यातील सरकारचे अपयश दाखवून देणाऱ्या पत्रकारांवर गुन्हे दाखल करत आहेत. राज्यात आतापर्यंत पंधरा पत्रकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे सांगताना दानवे यांनी यासंदर्भातील यादीच वाचून दाखवली. शिरीष बोराळकर, खासदार भागवत कराड, आमदार अतुल सावे, शहाराध्यक्ष संजय केणेकर आदी उपस्थित होते.

गायकवाड हे आमचे काका
भाजपमध्ये रावसाहेब दानवे यांचीही कोंडी केली जात असल्याचा आरोप भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी आजच केला. यासंदर्भात विचारले असता दानवे यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. गायकवाड हे आम्हा सर्वांचे काका आहेत आणि आम्ही त्यांचे पुतणे. काका-पुतण्यातील संबंध राज्याला सर्वश्रुत आहेत, एवढेच दानवे म्हणाले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They Hide Failure So Critise Union Government, Said Raosaheb Danve