बहूजनांचे राजकारण संपविण्याचा भाजपचा डाव : जयसिंगराव गायकवाड यांची टिका

मनोज साखरे
Sunday, 29 November 2020

फडणवीस, चंद्रकांत पाटलांना जयसिंगरावांचे शालजोडे! 

औरंगाबाद : भाजपमध्ये जीवघेणी स्पर्धा आहे. तेथे प्रत्येकाला प्रत्येकाची भीती वाटते. ‘युज अॅन्ड थ्रो’ हा त्यांचा विचार आहे. पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, विनोद तावडे, एकनाथ खडसे स्पर्धक होते म्हणुन त्यांना डावलले. मी कसलाच दावेदार नव्हतो तरी माझी फडणवीस, चंद्रकांत पाटील यांना भीती वाटत होती. बहुजनांचे राजकारण संपविण्याचा डाव ते करीत आहेत. असा आरोप भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी आज (ता. २९) औरंगाबादेत केला.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
ते म्हणाले, ‘‘रावसाहेब दानवेंना पक्षात दाबले जाते. खडसेंना पक्षात मातीमोल केले, पंकजा मुंडे यांचे आज काय हाल आहेत याचा विचार करा. ही बहूजन समाजाची माणसे आहेत. त्यांचा मतदार संघासी संपर्क होऊ दिला जात नाही, दहा दहा वर्षे पुढचा कट भाजपमध्ये केला जातो. पक्षाची सामुहिक निर्णयप्रक्रीया फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी विडा उचलुन संपविली. ‘त्या’ दोघांचीच मनमानी पक्षात असते. त्यांच्या मर्जीनेच पद दिले जाते. पक्षात कुणाचेच ते ऐकत नाही, त्यामुळे हजारो कार्यकर्तेही दुरावत आहेत. भाजपची छापील घटना त्यांनी पायदळी तूडविली. एकही कामे धड नाही, सामुहिक मत नाही. त्यामुळे मी पुर्ण विचार करुन, मानसिकता तपासुन पक्ष सोडला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

संघाला ‘रामराम’ 
आणीबाणीत स्वातंत्र्याचा गळा घोटला त्यावेळी आम्ही तुरुंग भोगला. तेव्हा चंद्रकांत पाटील कुठे होते? बारा वर्षे मी वाट पाहीली. भाजपमध्ये सध्याची पिलावळ काल आलेली आहे, त्यांच्याशी काय चर्चा करणार? पण अमीत शहांना पत्र लिहिले पण माझे ऐकले नाही, करण्यासारखे कामही दिले नाही. मी कामाचा भुकेला होतो. ज्यांनी रक्त सांडले, घाम गाळला. जेल भोगली त्यांना भाजपमध्ये किंमत नाही. त्यामुळे आता माझा ‘आरएसएस’शीही संबंध उरला नाही. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बोराळकरांची विधाने बालिश 
पदवीधरांचे मत कमवावे लागते. जो कायम संपर्कात असतो तोच टिकतो. समोरील पक्ष म्हणतो की, सतीश चव्हाण यांनी तोंड उघडले नाही. याउलट चव्हाण यांनी सभागृह वारंवार दणाणुन सोडले. कामे केली, बोराळकर केवळ उमेदवारी अर्ज भरतात मग त्यांचा संपर्क नसतो. चव्हाणांचा कार्य अहवाल सभागृहाच्या रेकार्डवर आहे. भाजपचा कार्य अहवाल कुठे आहे? बोराळकरांची विधाने बालिश आहेत. सतीश चव्हाण किमान २५ हजार मतांनी निवडून येतील असा विश्‍वास असल्याचेही गायकवाड म्हणाले. 

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP instinct to end politics of masses Jaysingrao Gaikwad said