बनावट धनादेशाद्वारे बॅंकेला तब्बल ३६ कोटींचा गंडा घालण्याचा प्रयत्न

रामराव भराड
Tuesday, 29 September 2020

बनावट धनादेशाद्वारे बॅंकेला तब्बल ३६ कोटींचा गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुध्द वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळूज (जि.औरंगाबाद) : कार बनवणाऱ्या कंपनीच्या नावे ३६ कोटी ५१ लाख रुपयांचा बनावट धनादेश तयार करून तो बँकेत वटवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २८) गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की शुक्रवारी (ता. चार) आयसीआयसीआय बँक शाखा, रामनगर, बेंगलोर येथील बँक अधिकारी यांच्याकडून फोनद्वारे कळविले, की आयसीआयसीआय बँक शाखेत ता. २५.८.२०२० रोजी ३६ कोटी ५१ लाख रुपये रकमेचा एक बनावट धनादेश महालक्ष्मी शिक्षण, सांस्कृतिक क्रीडा आणि वाचनालय प्रसारक मंडळ यांच्या नावे वटविण्यासाठी आला आहे. या चेकवर टोयोटा कंपनीचे अधिकारी मासाकाजू योशीमुरा, टाकुया नाकानिशी यांची सहीसारखी स्वाक्षरी असल्याचे दिसून येत आहे.

‘जीएसटी’चे ४३ अधिकारी कोरोनाच्या कामावर, अनेकांकडे अतिरिक्त जबाबदारी

हा धनादेश प्रोसेसिंगसाठी आपल्या टोयोटा किर्लोस्कर कंपनीकडून देण्यात आला आहे काय? याबाबतची विचारणा करून बँक अधिकारी यांनी धनादेशाची पुढील प्रोसेस करायची आहे काय? असे विचारले. बँकेकडून कंपनीच्या नावाने इतक्या मोठ्या रकमेचा बनावट धनादेश कोणीतरी लबाडीने रोखीकरणासाठी सादर केल्याचे कळताच तत्काळ तो धनादेश न वटविता थांबविण्यात आला. त्याची माहिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांनाही बँकेमार्फत देण्यात आली होती.

त्यानंतर बनावट धनादेशाच्या अनुषंगाने टोयोटा मोटार प्रा.लि. कंपनीच्या मेल आयडीवर ई-मेल करून कळविण्यात आले, की महालक्ष्मी शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडा आणि वाचनालय, प्रसारक मंडळ, खुलताबाद (जि. औरंगाबाद) यांच्या नावाचा ३६ कोटी ५१ लाख रुपयांचा धनादेश (क्र. २३८२४८ हा ता. २५.८.२०२० रोजीचा ००८४०५०००००१) टोयोटा किर्लोस्कर प्रा.लि. कंपनीच्या बिदादी औद्योगिक क्षेत्र, रामनगरम् बेंगलोर या बँक खात्यातून वटविण्याकरिता आयसीआयसीआय बँक शाखा, एमआयडीसी वाळूज, औरंगाबाद यांच्याकडे ता. ४ सप्टेंबर रोजी आला आहे. बँकेला संशय असल्याने बँकेने टोयोटा किर्लोस्कर मोटार प्रा.लि. कंपनीला धनादेशाच्या कलर झेरॉक्सची प्रत बेंगलोर येथील कार्यालयाला पाठविली. त्यानंतर धनादेशाबाबत कंपनीच्या कार्यालयाने माहिती घेतली असता, अशा प्रकाराचा धनादेश टोयोटा किर्लोस्कर कंपनीने कोणालाही दिलेला नाही.

Corona Update : औरंगाबादेत वाढले १८१ कोरोनाबाधित, उपचारानंतर २४३ रुग्ण बरे

त्यावरील सर्व माहिती चुकीची खोटी आहे व सही व शिक्काही बनावट असल्याचे दिसून आले. असे बँकेला कळाल्यानंतर पुढील बेकायदेशीर व्यवहार बँकेकडून रद्द करण्यात आला. महालक्ष्मी शिक्षण, सांस्कृतिक मंडळाच्या नावाने देण्यात आलेला धनादेश वटला नाही; परंतु संस्थेचे पदाधिकारी लक्ष्मी उमेश भारती यांनी स्वतः तो धनादेश वटविण्यासाठी बँकेत टाकला असल्याची माहिती मिळाली आहे. महालक्ष्मी शिक्षण व सांस्कृतिक मंडळ ही सामाजिक संस्था असून, त्या संस्थेची नोंदणी धर्मादाय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथे करण्यात आलेली आहे.

संस्थेचे कार्यालय, खुलताबाद (जि. औरंगाबाद) येथे आहे. त्या संस्थेच्या अध्यक्षा म्हणून लक्ष्मी उमेश भारती यांच्या नावाची नोंद आहे. वर नमूद संस्थेच्या पदाधिकारी यांच्यासोबत टोयोटा मोटार प्रा.लि.कंपनीचा कोणताही व्यवहार झालेला नाही. त्यामुळे याप्रकरणी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अजित बाळासाहेब जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thirty Six Crores Fraud Attempts Through Fake Cheque Aurangabad News