तीन लाख शंभूप्रेमींनी घेतला लाईव्ह व्याख्यानमालेचा लाभ 

राजेभाऊ मोगल
Saturday, 16 May 2020

शासनाची शिवचरित्राची आणि संभाजीराजे चरित्राची अधिकृत प्रत नाही. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने, इतिहास संशोधकांची नेमणूक करून अधिकृत प्रत करण्यासाठी प्रयत्न करावेत. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे श्री. खेडेकर म्हणाले.

औरंगाबाद : छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडतर्फे अधिकृत फेसबुक पेजवरून ता. ७ ते १४ मेदरम्यान सात दिवस फेसबुक लाईव्ह व्याख्यानमाला घेण्यात आली.  या व्याख्यानाचा तीन लाख लोकांनी लाभ घेतल्याचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी सांगितले.

हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान   

या व्याख्यानमालेचे उद्‍घाटन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांच्या हस्ते ७ मे रोजी सायंकाळी ५ वाजता झाले. त्यानंतर लगेच पहिले व्याख्यान डॉ. भानुसे यांचे ‘संभाजीराजे : जन्म, पार्श्वभूमी व संस्कार’ या विषयावर झाले. राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवरायांनी संभाजीराजांवर अतिशय चांगले संस्कार केले. त्यामुळे ते सर्वगुणसंपन्न व आदर्श स्वराज्यरक्षक झाले, असे डॉ. भानुसे यांनी सांगितले.

हेही वाचा : पद्धतशीर दृष्टीकोन ठेऊन लाॅकडाऊन उठवु शकतो - उद्योजक सुनील किर्दक

दुसऱ्या दिवशी प्रदेश संघटक प्रेमकुमार बोके यांचे ‘संभाजीराजे ः प्रशिक्षण व पराक्रम’ या विषयावर व्याख्यान झाले. शनिवारी (ता. नऊ) तुषार उमाळे यांचे ‘छत्रपती संभाजी महाराज ः एक स्वातंत्र्यवीर’ या विषयावर व्याख्यान झाले. संभाजीराजे धर्मवीर नव्हते, तर ते स्वातंत्र्यवीर होते, असे ते म्हणाले. रविवारी (ता. दहा) प्रा. दिलीप चौधरी यांचे ‘छत्रपती संभाजी महाराज यांचा सांस्कृतिक व धार्मिक संघर्ष’ या विषयावर व्याख्यान झाले.

हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात.. 

संभाजीराजांना बाहेरच्या शत्रूपेक्षा अंतर्गत शत्रूंशी खूप मोठा संघर्ष करावा लागला, असे चौधरी यांनी सांगितले. त्यानंतर सोमवारी (ता. ११) सुदर्शन तारक यांचे ‘छत्रपती संभाजी महाराज आणि लेखन’ या विषयावर व्याख्यान झाले. मंगळवारी (ता. १२) रंजना हसुरे यांचे ‘छत्रपती संभाजी महाराज यांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन’ यावर, तर बुधवारी (ता. १३) डॉ. बालाजी जाधव यांचे ‘छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या ः एक विश्लेषण’ या विषयावर व्याख्यान झाले.

हेही वाचा : बोंबाबोंब झाल्यानंतर आली प्रशासनाला जाग

गुरुवारी (ता. १४) प्रवक्ते गंगाधर बनबरे यांचे ‘छत्रपती संभाजी महाराज जन्मदिवस’ या विषयावर व्याख्यान झाले. संभाजीराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण झाले आहे. खरा इतिहास पुढे येणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे बनबरे यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष  मनोज आखरे व मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्याख्यानमालेचा अध्यक्षीय समारोप केला.

हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ  

शासनाची शिवचरित्राची आणि संभाजीराजे चरित्राची अधिकृत प्रत नाही. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने, इतिहास संशोधकांची नेमणूक करून अधिकृत प्रत करण्यासाठी प्रयत्न करावेत. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे खेडेकर म्हणाले. व्याख्यानमालेचे संयोजन संभाजी ब्रिगेडचे सोशल मीडियाप्रमुख शुभम शेरकर यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three lakh Shambhu lovers took it The benefit of a live lecture series