औरंगाबाद : हिलाल कॉलनीत एकाच घरातील तीन तरुणींना कोरोना

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 April 2020

आता आसेफिया कॉलनी, जलाल कॉलनी, आरेफ कॉलनी आणि त्याच परिसरातील हिलाल कॉलनीत सलग रुग्ण सापडत असल्यामुळे हा भागही कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत चालला आहे. त्यामुळे शहराचाही धोका वाढत असल्याचे दिसून येत आहे.

औरंगाबाद : हिलाल कॉलनीत एकाच घरातील तीन तरुणींचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या तिघींसह आता औरंगाबादची रुग्णसंख्या ४७वर गेल्यामुळे भीती चांगलीच वाढली आहे.

औरंगाबादेत शुक्रवारी (ता. २४) चार जणांना कोविड -१९ विषाणुचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. पण रात्री उशिरा आणखी तीन तरुणींचा चाचणी अहवाल सकारात्मक आला. या तिघीही हिलाल कॉलनी परिसरात राहणाऱ्या असून, एकाच घरातील असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले. अनुक्रमे १८, २६ आणि ३१ अशी या तरुणींची वये असल्याची माहितीही त्यांनी दिली.

आधीच्या केसेस अशा सापडल्या

शुक्रवारी दुपारी भीमनगर भावसिंगपुरा येथील २७ वर्षीय तरुण आणि आसेफिया कॉलनी येथील ३८ वर्षीय पुरुषाचे, तर सायंकाळी समतानगर येथील २४ वर्षीय तरुण आणि ३७ वर्षीय महिलेचे स्वॅब नमुने पॉझिटीव्ह आले होते. 

HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा

समतानगर हा भाग हॉटस्पॉट ठरला असुन येथील रुग्णसंख्या आठवर पोचली होती. तसेच भीमनगर-भावसिंगपुरा येथील ७६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता.  या महिलेच्या मृत्यूनंतर लाळेच्या चाचणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता.

त्या महिलेच्या अंत्यविधीला अनेक लोक सहभागी होती. सहभागी एका व्यक्तीचा गुरुवारी अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर याच भागातील २७ वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. भिमनगर भावसिंगपुरा येथील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या दोन झाली. 

औरंगाबादेतील कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

आता हा भाग धोकादायक

समतानगर येथे सर्वप्रथम ३८ वर्षीय कारागिराला कोरोनाची लागण झालीय त्यानंतर शुक्रवारी येथील समतानगर येथील २४ वर्षीय तरुण आणि ३७ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आसेफिया कॉलनीतही नातेवाईकांतुन ३८ वर्षीय पुरुषाला संसर्ग झाला आहे.

आता आसेफिया कॉलनी, जलाल कॉलनी, आरेफ कॉलनी आणि त्याच परिसरातील हिलाल कॉलनीत सलग रुग्ण सापडत असल्यामुळे हा भागही कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत चालला आहे. त्यामुळे शहराचाही धोका वाढत असल्याचे दिसून येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three More Corona Positive In Aurangabad Total 47 Now