esakal | औरंगाबाद : आरेफ कॉलनी, सिडको एन-चार सील, नगरसेवक पुरवणार भाजीपाला
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना बाहेर न पडण्याच्या सूचना पोलिस देत आहेत. आवश्यक असेल तेव्हाच किराणा माल किंवा भाजी खरेदी करायची असल्यास नागरिकांना स्थानिक नगरसेवकांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. त्यांच्यामार्फतच नागरिकांनी बाहेर पडावे असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

औरंगाबाद : आरेफ कॉलनी, सिडको एन-चार सील, नगरसेवक पुरवणार भाजीपाला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरातील आरेफ कॉलनी आणि सिडको एन-चार या परिसरामध्ये कोरोनाबाधित दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली असून, हे परिसर सील करण्यात आले आहेत. तिथे पोलिस नागरिकांना खबरदारीच्या उपायांबाबत सूचना देत आहेत. 

शहरात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत. यातील एक आरेफ कॉलनी, तर दुसरा सिडको एन-चार भागातील आहे. सिडको एन-चार भागामध्ये पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे व त्यांच्या पथकाने धाव घेतली. एन-चारचा विशिष्ट भाग त्यांनी सील केला आहे. त्यानंतर या भागातील किराणा दुकान आणि मेडिकल स्टोअर्सही बंद करण्यात आले आहेत. 

खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना बाहेर न पडण्याच्या सूचना पोलिस देत आहेत. आवश्यक असेल तेव्हाच किराणा माल किंवा भाजी खरेदी करायची असल्यास नागरिकांना स्थानिक नगरसेवकांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. त्यांच्यामार्फतच नागरिकांनी बाहेर पडावे असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

पोलिसांचे कडक पहारे

कोरोनाच्या संशयावरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सोनवणे आणि त्यांच्या पथकाने एक दिवस आधीच काळजी आणि खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या व मेडिकल आणि किराणा दुकानदारांनाही पोलिसांनी विशिष्ट वेळेत दुकान उघडण्यास सांगितले होते. आता या परिसरात अत्यंत काळजी घेण्यात येत आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, घराबाहेर पडू नये असे आवाहनही सहायक पोलिस निरीक्षक सोनवणे यांनी केले आहे.

शहरात दुसरा रुग्ण आरेफ कॉलनी भागातील आहे. त्यामुळे या भागात बेगमपुरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन सानप व त्यांचे सहकारी खबरदारीच्या उपाययोजना करीत आहेत. या भागातही नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले असून, दोन्ही भागांत निर्जंतुकीकरण करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा