esakal | एकाच दिवशी काकाचा शेततळ्यात, पुतण्याचा अपघातात मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Two Members of Family Die  At Shekta Dist Aurangabad

शेकटा येथे दहा तासांच्या फरकाने घडलेल्या घटना

एकाच दिवशी काकाचा शेततळ्यात, पुतण्याचा अपघातात मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

करमाड (जि. औरंगाबाद) : शेततळ्यातील विजेचा पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या रामनाथ भाऊसाहेब वाघ (५०,) यांचा शुक्रवारी (ता. आठ) सकाळी पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याच दिवशी रात्री दुचाकीवर रस्ता ओलांडताना वाहनाने धडक दिल्याने सौरभ शिवराज वाघ (१६) याचा मृत्यू झाला. मृत दोघे शेकटा (ता. औरंगाबाद) गावचे रहिवासी असून, नात्याने काका, पुतण्या आहेत. दहा तासांच्या फरकाने दोनजण गेल्याने वातावरण सुन्न झाले आहे. 

रामनाथ वाघ हे नेहमीप्रमाणे पत्नी, मुलांसोबत शुक्रवारी सकाळी नऊला शेतात गेले. पिकास पाणी देण्यासाठी शेततळ्यातील वीजपंप सुरू करताना पाय घसरून ते शेततळ्यात पडले. त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने पत्नी, मुलगा, आजूबाजूचे शेतकरी धावले. त्यांना पाण्याबाहेर काढून तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर रात्री दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुले आहेत. 

अस्वस्थ वर्तमान 

या घटनेमुळे रामनाथ, त्यांचा चुलत पुतण्या सौरभ याच्या घरी पाहुण्यांची मोठी गर्दी होती. घरात पिण्याचे पाणी कमी पडू नये म्हणून सौरभ रात्री आठला दुचाकीवर (एमएच-२०, डीयू-५३७२) गावाशेजारील हसनाबाद फाट्यावरील आर. ओ. फिल्टर प्लँटवरून पाण्याचा जार आणण्यासाठी गेला. जार घेऊन घराकडे येण्यासाठी रस्ता ओलांडताना शेकट्याहून करमाडकडे दुधाची वाहतूक करणाऱ्या पिकअपने (एमएच-२०, ईएल-६१८) त्याला जोराची धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत सौरभला घाटी रुग्णालयात हलवले असता, रात्री बाराच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शनिवारी (ता.नऊ) सकाळी शवविच्छेदन केल्यानंतर दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

रामनाथ वाघ यांच्या मृत्यूची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. सौरभच्या अपघाताबाबत शनिवारी सायंकाळपर्यंत पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुशांत सुतळे, हेडकॉन्स्टेबल राहुल मोहतमल करीत आहेत. 

वेदनादायी : भाकर करंटी; रक्तात नाहली
 
पैठण येथे बालकाचा मृत्यू 
पैठण : वीज खांबाचा वीजप्रवाह असलेल्या तारेवर हात पडल्याने साडेपाचवर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना चनकवाडी (ता. पैठण) येथे शनिवारी (ता. नऊ) सकाळी दहाच्या सुमारास घडली. यश गणेश सामसे असे या बालकाचे नाव आहे. 
पोलिसांनी सांगितले की, यश हा आईसोबत गावालगतच्या गोदावरी नदीवर गेला होता. आईचे कपडे धुणे झाल्यावर दोघेही घराकडे येत असताना या रस्त्यावरील एका शेतातवळ महावितरण कंपनीच्या खांबाला आधार म्हणून लावण्यात आलेल्या तारेला या बालकाचा हात लागला. त्या तारेत वीजप्रवाह उतरलेला असल्याने विजेच्या धक्क्याने यशचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. बालकाच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल किशोर शिंदे, कर्तारसिंग सिंघल, समाधान भागिले हे अधिक तपास करीत आहेत.