तेलाला महागाईचा तडका, दिवाळीपासून वाढलेले खाद्यतेलाचे दर कायम

प्रकाश बनकर
Monday, 7 December 2020

देशात अमेरिकेसह इतर देशातून होणारी पाम तेलाची आयात नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बंद झाली. त्यामुळे ऐन दिवाळीत तेलाच्या किमती १० ते ३० रुपयांची दरवाढ झाली.

औरंगाबाद : देशात अमेरिकेसह इतर देशातून होणारी पाम तेलाची आयात नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बंद झाली. त्यामुळे ऐन दिवाळीत तेलाच्या किमती १० ते ३० रुपयांची दरवाढ झाली. यामुळे पाम तेलापासून सर्वच खाद्यतेलाची किमती शंभरापार गेली. दिवाळी होऊन पंधरवडा झाला तरीही तेलाच्या किमतीत कसलीच घट झाली नाही. यात लग्नसराई सुरु झाल्यामुळे यात आणखी वाढ होण्याची शक्यता हडकोतील तेलविक्रेते विनोद चौंडीया यांनी सांगितले.

कोरोनामुळे सर्वच क्षेत्रावर कमी अधिक परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यासह हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यांना अधिक फटका बसला आहे. अनलॉक नंतर त्यातून सावरण्यासाठी धडपड सुरु आहे. कोरोनाच्या सावटामुळे अनेकांची आर्थिक ओढताण होत असतानाच स्वयंपाक घरात रोज लागणारे खाद्यतेलाचे भाव मात्र काही कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. उलट त्यात आणखीन वाढ झाल्याने सर्वसामान्यांना महागाईची झळ बसत आहे.

ऑगस्ट महिन्यात सूर्यफूल तेलाचा दर ९८ रुपये प्रति लीटर होता. सप्टेंबरच्या पहिल्या आ‌‌ठवड्यात ११० रुपये दर होता. तर दिवाळीच्या आधीपासून सूर्यफूल तेलाचा दर हा लीटरमागे १२० रुपयांच्या घरात आहे. सध्या १२० ते १२४ पर्यत पोहचले आहे. तर करडईच्या भावात गेल्या काही महिन्यात चढ उतार पाहण्यास मिळाला असला तरी गेल्या महिनाभरापासून भाव स्थिर आहे. गेल्या महिनाभरापासून १६४ रुपये तर सध्या १७० ते १७२ रुपये प्रतिलिटर असा दर असल्याची माहिती चौंडिया यांनी दिली. तर शेंगदाणे तेलासाठी सध्या १४६ तर एक लीटर मोहरीच्या तेलासाठी १५० रुपये मोजावे लागतात. सोयाबीन तेलाच्या दरही चढेच असून २४ दिवसांत त्यात लिटरमागे पाच रुपयांची वाढ झाली आहे. तिळ तेल्याचे भाव गेल्या स्थिर असून १७० रुपये प्रतिलिटर दराने त्याची विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

विविध खाद्यतेलांचे भाव
तेल-------- दिवाळीतील किंमत----------- सध्याचे दर (किलो)
पामतेल---------९०---------------१०७ रुपये
सरकी-----------९८---------------११५
सोयाबीन---------१००---------------११८ ते १२०
सूर्यफूल-----------१०४--------------१२० ते १२४
शेंगदाणा----------१३५---------------१४५ ते १४८
करडी-----------१६०---------------१७० ते १७२

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Various Edible Oils Hike Continue Aurangabad News