घाटीच्या सुपरस्पेशालिटीसाठी लवकरच पदभरती, वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुखांची माहिती

मनोज साखरे
Thursday, 15 October 2020

घाटी रुग्णालयातील सुपरस्पेशालिटी ब्लॉकसह महिला, बाल रुग्णालयातील पदभरती लवकरच केली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी (ता.१५) दिली.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील सुपरस्पेशालिटी ब्लॉकसह महिला, बाल रुग्णालयातील पदभरती लवकरच केली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी (ता.१५) दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनासंदर्भात आयोजित आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री.देशमुख म्हणाले, की राज्यातील कोरोना उपाययोजनांची नोंद जागतिकस्तरावर घेतली जात आहे.

औरंगाबादच्या जैन इंटरनॅशनल स्कूलची मनसेकडून तोडफोड

टेस्टिंगमध्ये कमी पडणार नाही याची दक्षताही घेतली जात आहे. वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा कमी पडणार नाही. यासाठी औरंगाबादेतच नवीन प्लॅंट टाकण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत. घाटीतील सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील पदभरतीबाबतची मान्यता अंतिम टप्प्यात असुन लवकरच ही पदे भरली जाईल. कोरोना रुग्णांना तातडीने अत्यावश्यक उपचार सुविधा उपलब्ध होणे हे मृत्यू रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे.

त्यादृष्टीने जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये आवश्यकतेप्रमाणे बेड्स उपलब्धता ठेवण्याचे सांगण्यात आले असुन अत्यावश्यक उपचार सुविधेबाबतही काळजीपुर्वक लक्ष द्यावे, असे ते म्हणाले. यावेली जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजय काळे, मनपा उपायुक्त श्री. नेमाडे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे, घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर, मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ.नीता पाडळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर शेळके आदी उपस्थित होते.

उद्धव ठाकरेंनी फक्त बांद्राचे मुख्यमंत्री न राहता महाराष्ट्राचा विचार करावा, भाजपचे माजी मंत्री निलंगेकरांचा सल्ला

रुग्णांना परतावा
खासगी रुग्णालयाविरुद्ध जादा बिल आकारल्याबाबत तक्रारी आल्या आहेत. त्याबाबत संबंधित रुग्णालयांना नोटीसही बजावल्या. रुग्ण, नातेवाईकांना परतावाही देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. आगामी काळात अशा रुग्ण, नातेवाईकांना परतावा दिला जाईल असेही श्री.देशमुख यांनी सांगितले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Very Soon Recruitment For Ghat's Super speciality Aurangabad News