औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे, वंचितने दिला शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

मधुकर कांबळे
Thursday, 17 December 2020

केंद्र सरकारने मंजुर केलेले कृषी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठींबा देण्यात आला.

औरंगाबाद : केंद्र सरकारने मंजुर केलेले कृषी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठींबा देण्यात आला. यासाठी गुरूवारी (ता.१७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने राज्यात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणुन गुरूवारी (ता.१७) जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे देण्यात आले.

 

 

शेतकरी विरोधी निर्णय घेणाऱ्या केंद्र सरकारचा जाहीर निषेध, काँग्रेस व राष्ट्रवादी यांचा केंद्र सरकारला छुपा पाठिंबा आहे, केंद्र सरकार हुकूमशाही करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केला. केंद्र सरकारने अंमलात आणलेले तीनही निर्णय शेतकरी विरोधात आहेत, एका शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागली ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. राज्य सरकार केंद्राला विरोध करत असल्याचे भासवत असून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.

 

 

केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा विषय संवेदनशील पद्धतीने हाताळून घेतलेले निर्णय रद्द करावेत अन्यथा शेतकऱ्यांसह सर्व वर्गातील जनतेला सोबत घेऊन आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनामध्ये ऑल इंडिया पँथर सेना, सम्यक विद्यार्थी आंदोलन व शेतकऱ्यांचा सहभाग होता. अमित भुईगळ यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी सिद्धार्थ मोकळे, योगेश बन, प्रभाकर बकले, ॲड. लता बामणे, संदीप शिरसाठ, वंदना नरवडे, पंकज बनसोडे, रवीकुमार तायडे, मिलिंद बोर्डे, बाबा पटेल, बाबासाहेब वाघ, शैलेंद्र मिसाळ, श्रीरंग ससाणे, पी. के. दाभाडे, कन्नड तालूकाध्यक्ष देविदास राठोड, वैजापूर तालूकाध्यक्ष सिद्धार्थ तेझाड, खुलताबाद तालूकाध्यक्ष मुक्तार सय्यद, गंगापूर तालूकाध्यक्ष देविदास लांडे पाटील, सम्यक विद्यार्थी आंदोलन प्रदेश महासचिव प्रकाश इंगळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wanchit Aghadi Agitation Before Aurangabad District Collectorate