esakal | धो-धो पाऊस...चौदा वर्षानंतर हा तलाव काठोकाठ 

बोलून बातमी शोधा

Aurangabad amc news

यंदा सुरवातीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे तलावातील पाणीसाठा वाढला असून, एक ऑगस्टला सकाळी २५ फूट एवढा साठा तलावात होता.

धो-धो पाऊस...चौदा वर्षानंतर हा तलाव काठोकाठ 
sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद ः गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे यंदा ऑगस्ट महिन्यातच हर्सूल तलाव काठोकाठ भरला आहे. पुढील चोवीस तासांत तलाव ओव्हरफ्लो होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने खाम नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तलावाच्या सांडव्याचे पाणी खाम नदीतून वाहते. नदीपात्रात हजारो अतिक्रमणे असून, पाऊस वाढलाच तर या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम महापालिकेला करावे लागणार आहे. 

जुन्या शहरातील सुमारे १६ वॉर्डांची तहान भागविणारा हर्सूल तलाव अनेक वर्षांपासून कोरडाच होता. गतवर्षी १४ फुटांपर्यंत पाणी तलावात आले होते. त्यामुळे महापालिकेने हर्सूल तलावातून काही वॉर्डांना पाणीपुरवठा सुरू करण्याची तयारी केली. मात्र तलावातील पातळी कमी झाल्यास परिसरातील शेकडो बोअर आटून नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे या भागातील नगरसेवकांनी पाणीपुरवठा सुरू करण्यास विरोध केला. दरम्यान, यंदा सुरवातीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे तलावातील पाणीसाठा वाढला असून, एक ऑगस्टला सकाळी २५ फूट एवढा साठा तलावात होता. तलावाची साठवण क्षमता २८ फूट आहे. त्यामुळे पुढील चोवीस तासांत तलाव ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा 

 १४ वर्षांपूर्वी भरला होता तलाव 
निजामकालीन या तलावाची उंची सुमारे २८ ते २९ फूट आहे. यापूर्वी तलाव २००६ मध्ये ओव्हरफ्लो झाला होता. मात्र, ऑगस्ट महिन्यात तलाव ओव्हरफ्लो होण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच वेळ आहे. 
 
या भागाला आहे धोका 
तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर बिस्मिल्ला कॉलनी, दिलरस कॉलनी, हिलाल कॉलनी, आरेफ कॉलनी, बेगमपुरा, बारापुल्ला गेट भागात नदीच्या काठावरील नागरिकांना धोका आहे. त्यामुळे महापालिकेने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. 

हजारो घरांना धोका 
खाम नदीच्या पात्रात हजारो अतिक्रमणे आहेत. तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी नदीपात्रातील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर रुंद झालेले नदीपात्र पुन्हा अतिक्रमणांच्या विळख्यात सापडले आहे. पुराच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगावी, नदीपात्रातील अतिक्रमणे काढून घ्यावीत; अन्यथा महापालिका नुकसानीला जबाबदार राहणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा