अरे बाप ! औरंगाबादेत पाणीपट्टीची थकबाकी ३२१ कोटी, सव्वा लाख नळच गायब.  

माधव इतबारे
Sunday, 18 October 2020

एक लाख १६ हजार नळच महापालिकेच्या रेकॉर्डवर 

औरंगाबाद : काही वर्षांपासून आर्थिक संकटात असलेल्या महापालिकेला पाणीपट्टी वसुलीतही मोठा फटका बसला आहे. थकबाकीची एकूण रक्कम तब्बल ३२१ कोटींवर गेली आहे तर २०२०-२१ या आर्थिक वर्षांची ६१ कोटी रुपयांची मागणी आहे. यातील फक्त १३ कोटी रुपये आतापर्यंत वसूल झाले आहेत. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
शहरातील पाणीपुरवठा अनेक वर्षांपासून ऑक्सिजनवर आहे. नागरिकांना काही भागात तब्बल पाच दिवसांआड तर काही ठिकाणी सहा-सात दिवसांनंतर पाणी मिळते. त्यातही जीर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनेमुळे वारंवार व्यत्यय येतो. अत्यल्प पाणी मिळत असताना तब्बल चार हजारपेक्षा जास्त रुपयांची पाणीपट्टी भरायची कशाला? अशा भूमिकेत नागरिक आहेत. पाणीपट्टी कमी करण्याची मागणीदेखील विविध संघटनांतर्फे सुरूच आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दरम्यान, समांतर पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने महापालिकेला शहरातील नळांचे रेकॉर्ड देण्यास टाळाटाळ केली. त्याचा फटका पाणीपट्टी वसुलीला बसला. ज्या नागरिकांनी स्वेच्छेने पाणीपट्टी भरली तेवढीच रक्कम जमा झाली. गेल्या काही वर्षांतील थकबाकीचा आकडा ३२१ कोटींवर गेला असल्याचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. महापालिकेच्या रेकॉर्डवर फक्त एक लाख १६ हजार नळ कनेक्शन आहेत. ‘समांतर’ची कंपनी गेल्यानंतर यंदा प्रथमच नळांची बिले अंतिम करण्यात आली आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बेकायदा नळांचा शोध घेणार 
शहरातील नळांना स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत मीटर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी पुण्याच्या संस्थेमार्फत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. मीटर बसविण्याचे काम सुरू झाल्यानंतर शहरातील बेकायदा नळांचा शोधही घेतला जाईल, असे प्रशासक श्री. पांडेय यांनी स्पष्ट केले. 

अशी आहे आकडेवारी 

  • निवासी नळ-१,१४,६२९ 
  • थकबाकी-२६४,९८,९२,५९२ 
  • चालू मागणी- ४९,१४,३७,७८२ 
  • एकूण-३१४,१३,३०,३७४ 

 

  • व्यावयासिक नळ-१९२३ 
  • थकबाकी-५६,५५,६५,५९९ 
  • चालू मागणी-११,८०,३५,९५५ 
  • एकूण- ६८,३६,०१,५५४ 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water bill arrears Aurangabad news