एमआयएम आणि भाजपचे काय संबंध होते ते अजूनही कळाले नाहीत, राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचा बागडेंना टोला

नवनाथ इधाटे
Monday, 7 December 2020

विधानसभा अध्यक्ष असताना हरिभाऊ बागडे माझ्यापेक्षा एमआमएमचे तेव्हाचे आमदार इम्तियाज जलील यांनाच जास्त बोलण्याची संधी देत असत. तेव्हा एमआयएम आणि भाजपचे काय संबंध होते ते मला अजूनही कळाले नाहीत, अशा टोला राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांना लगावला.

फुलंब्री (जि.औरंगाबाद) :  विधानसभा अध्यक्ष असताना हरिभाऊ बागडे माझ्यापेक्षा एमआमएमचे तेव्हाचे आमदार इम्तियाज जलील यांनाच जास्त बोलण्याची संधी देत असत. तेव्हा एमआयएम आणि भाजपचे काय संबंध होते ते मला अजूनही कळाले नाहीत, अशा टोला राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांना लगावला. फुलंब्री तालुक्यातील खामगाव फाटा येथे शासकीय कापूस खरेदी केंद्राचे उदघाटन रविवारी (ता.सहा) करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे, पणनचे संचालक शिवाजी दसपुते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाप्रमुख कैलास पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, बांधकाम सभापती किशोर बलांडे,जिल्हा उपाध्यक्ष नितीन देशमुख, तालुकाप्रमुख राजेंद्र ठोंबरे, तहसीलदार शीतल राजपूत आदी उपस्थित होते. अब्दुल सत्तार म्हणाले, की भाजप आणि एमआयएमचे संबंध काय आहेत. हे अजुनही बहुतांश लोकांना कळलेले नाहीत. त्यात मी सुद्धा आहे. निवडणुकीच्या एकमेकांवर जहरी टीका करायची आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची. ही भाजप आणि एमआयएमची पद्धत आहे. याचा प्रयत्य मला हरिभाऊ बागडे विधानसभा अध्यक्ष असताना येत होता, अशी तक्रार त्यांनी केली.

केंद्राने महाराष्ट्राला मदत केली नाही - खैरे
महाराष्ट्रातील अनेक संघटना व उद्योजकांनी पंतप्रधान निधीसाठी भरीव मदत दिल्लीला पाठवली. मात्र केंद्र सरकारने राजकीय भावनेतून कोरोनाच्या संकटात महाराष्ट्राला आर्थिक मदत केली नाही, अशी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली. संकटाच्या काळात सर्व राजकीय पक्षांनी हातात हात घेऊन काम केले पाहिजे. महाविकास आघाडीने पदवीधर संघाच्या निवडणुकीत चार जागा जिंकून विरोधकांना महाआघाडीची ताकद दाखवून दिली आहे. आम्ही लवकरच शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देणार आहे. याबाबत लवकरच मंत्रिमंडळात निर्णय होणार असल्याचे खैरे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या भावना भडविण्याचे काम राज्य सरकार करते - बागडे
आमदार बागडे म्हणाले, की फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयातून शेतकऱ्यांचे शेतीमाल विक्रीत अडत व हमालीच्या माध्यमातून सुमारे ३१ हजार कोटी रुपये वाचले आहे. केंद्र सरकारच्या कृषी विधेयकातून शेतकरी आता आपला शेतीमाल कोठेही आणि कोणालाही सहज विक्री करू शकतो. मात्र राज्य सरकारचे पदाधिकारी विविध अफवा पसरवून शेतकऱ्यांच्या भावना भडकविण्याचे काम करीत आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is relation Between MIM And BJP, Minister Sattar Said