Aurangabad News
Aurangabad News

लॉकडाऊन हटवताना अशी  घ्यावी काळजी - डॉ. अजित भागवत

औरंगाबाद : २५ मार्च पासून सुरु केलेला लॉकडाऊन आता हटवण्याची वेळ जवळ आली आहे, असे सरकारने जाहीर केले आहे. कोविड -१९ साथीच्या आलेखाचे सपाटीकरण करणे आणि आगामी संकटाला तोंड देण्यासाठी सरकारी यंत्रणेला वेळ देणे, हे दोन हेतू लॉकडाऊन लागू करण्यामागे होते. साथ पसरण्याचा वेग कमी झाला असला तरी देशात आणि महाराष्ट्रात रुग्णसंख्या रोज वाढतानाच दिसत आहे. त्यामुळे लॉकडाऊन हटवल्यानंतर साथ अधिक वेगाने पसरेल, असे गृहीत धरूनच चालावे लागेल. लॉकडाऊनचे शिथिलीकरण तीन टप्प्यांमध्ये करण्याचे नियोजन झाले आहे. ते करताना खालील बाबींचा विचार करण्याची गरज असल्याच्या सुचना येथील प्रसिद्ध हदयविकार तज्ज्ञ डॉ. अजित भागवत यांनी केल्या आहेत.

१. धार्मिक आणि प्रार्थनास्थळे पहिल्या टप्प्यात उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गोष्टीची प्राथमिकता अनाकलनीय आहे. वैद्यकीय किंवा आर्थिक या दोन्ही स्तरावर याचा कोणताही फायदा होणार नाही. उलट नुकसानच  होण्याची शक्यता जास्त आहे. सोशल डिस्टंसिंग  पाळण्यातील अडचण आणि प्रार्थना म्हणताना नका-तोंडावाटे होणारा  व्हायरस चा प्रसार या दोन्ही गोष्टीमुळे धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो हा अनुभव भारतात आणि परदेशात आला आहे.  त्यामुळे धार्मिक व प्रार्थना स्थळे उघडणे हे शेवटच्या टप्प्यात करणे इष्ट ठरेल 

२. कंटेनमेंट झोन्स सोडून इतर ठिकाणी जनजीवन टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्याचे देखील आदेश आहेत व ते योग्यही आहेत. परंतु दाटीवाटीच्या वस्तीत व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो असे दिसून आले आहे. त्या मुले नॉन-कंटेनमेंट झोन मधील गर्दीच्या वस्त्यांमध्ये देखील लॉकडाऊन मधील नियम आणखी काही काळासाठी लागू ठेवणे गरजेचे आहे असे वाटते. लोकसंख्या आणि क्षेत्रफळ यांचे निकष लावून  या वस्त्यांचे वर्गीकरण करणे सहज शक्य आहे. 

३. लहान बालकामध्ये व्हायरस लागण होण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने प्राथमिक व माध्यमिक शाळा लवकर सुरु करणे योग्य ठरेल. महाविद्यालये काही काळानंतर सुरू करता येतील. 

४. जेष्ठ व्यक्तीनी (७० वर्षे व त्या पुढील) अजून ६ महिने तरी लॉकडाऊनचे नियम पाळावेत या संबंधी समाज प्रबोधन मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. प्रत्येक कुटुंबाने याबद्दल जागरूक राहून या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. 

५. मॉल किंवा हॉटेल मध्ये एका वेळी एका विशिष्ट संख्यामर्यादे पलीकडे आणि ठराविक वेळे पलीकडे लोकांना प्रवेश देऊ नये. प्रवेश केल्यानंतर मास्क आणि सोशल डिस्टंसिंग चे पालन काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असावे 

६. कोविड साथीची दुसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून सरकारने आताच काही निकष निश्चित करावेत जेणेकरून वेळेवर त्वरित प्रतिबंधक उपाय योजता येतील. त्यासाठी टेस्टिंग आणि सर्व्हेलन्स चालू ठेवणे आवश्यक राहील. 

७. मास्क घालणे, वारंवार हात धुणे आणि खोकतानाचे शिष्टाचार पाळणे हे आता भविष्यात दीर्घ कालावधीसाठी अंगीकारावे लागेल 

८. कोविडमुळे  क्वारंटाईन झालेल्या, कोविड  होऊन गेलेल्या व्यक्तीकडे किंवा त्यांची काळजी घेणाऱ्या आरोग्य सेवकांकडे कलंकित दृष्टीने बघणे किंवा त्यांना वाळीत टाकणे हे सर्रास दिसू लागले आहे . यासाठी सततच्या समाज प्रबोधनाची गरज आहे 

९. रुग्णालये हा आरोग्यसेवेचा कणा आहे आणि त्यामुळे आरोग्य सेवकांना सर्व सुविधा आणि पी.पी.ई. किट्स चा मुबलक पुरवठा करणे याला कोणताही पर्याय नाही. यामध्ये सर्व जनतेचा सहभाग आणि प्रतिसाद आवश्यक आहे आणि तेव्हाच कोविडवर विजय मिळवणे शक्य होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com