esakal | मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी युवक टॉवरवर! औरंगाबाद जिल्ह्यात शोलेस्टाईल आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Maratha Reservation

मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवून शासनाने तूर्तास नोकर भरती रद्द करावी. आरक्षणासंदर्भात लवकर निर्णय घ्यावा, या मागणीसाठी मंगळवारी (ता.२२) सकाळी नऊ वाजल्यापासून पाचोड (ता.पैठण) येथील भागवत भुमरे या तरुणाने मोबाईल टॉवरवर चढून उपोषणास सुरूवात केली.

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी युवक टॉवरवर! औरंगाबाद जिल्ह्यात शोलेस्टाईल आंदोलन

sakal_logo
By
हबीबखान पठाण

पाचोड (जि.औरंगाबाद) : मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवून शासनाने तूर्तास नोकर भरती रद्द करावी. आरक्षणासंदर्भात लवकर निर्णय घ्यावा, या मागणीसाठी मंगळवारी (ता.२२) सकाळी नऊ वाजल्यापासून पाचोड (ता.पैठण) येथील भागवत भुमरे या तरुणाने मोबाईल टॉवरवर चढून उपोषणास सुरूवात केली. हा तरुण छावा क्रांतिवीर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष आहे. उपोषणस्थळी ग्रामस्थांसह तरुणांनी मोठी गर्दी केली होती. महसुल अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचारी उपोषण मागे घेण्यासाठी संबंधीत तरुणाची विनवणी करीत होते. अखेर सायंकाळी पाच वाजता नायब तहसिलदार संतोष अनार्थे यांच्याकडून लेखी आश्‍वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.  


मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने  दिलेली स्थगिती उठवावी, मराठ्यास आरक्षण नसल्याने त्याचे खूप नुकसान होत आहे. आरक्षण मिळेपर्यंत नोकरभरती थांबविण्यात यावी व मराठा आरक्षणासंदर्भात लवकर निर्णय घ्यावा. या मागणीसाठी येथील भागवत भुमरे या तरुणाने प्रशासनाकडे निवेदने देऊन उपोषणासंबंधी पूर्वसूचना दिली होती. प्रथमतःच येथे तरुणाकडून शोले स्टाइल उपोषण करण्यात येत असल्याने घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली. संबंधीत उपोषणाची माहीती मिळताच पाचोडचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळी व इतर कर्मचाऱ्यांना उपोषणस्थळी पाठविले.

दरम्यान स्थानिक पोलिस घटनास्थळी धाव घेऊन युवकाने खाली उतरावे. यासाठी प्रयत्न केले. मात्र युवक मागणी होईपर्यत खाली न उतरण्याचा आपला निर्णय असल्याचे सांगत आहे. पोलिसांनी महसूल प्रशासनाला या घटनेची कल्पना दिली असुन नायब तहसिलदार संतोष अनार्थे , तलाठी चंदेल ठाकुर यांनी न्यायालयाने मराठा आरक्षण स्थगिती दिली असून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे समजावले होते. मात्र भागवत भुमरे याने टॉवरवरून मोबाईलद्वारे व्हिडिओ प्रसारीत केला. यांत जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचे सांगितले. या ठिकाणी खबरादारीचा उपाय म्हणून पाचोड पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

संपादन - गणेश पिटेकर