मृत्यूनंतरही इथे भोगाव्या लागतात मरणयातना...

पांडुरंग उगले 
Saturday, 4 April 2020

माजलगाव - मंजरथ रस्त्यावर मनूरवाडी (ता. माजलगाव) गाव वसलेले आहे. जेमतेम दोन, अडीच हजार लोकसंख्या असलेल्या मनूरवाडीत स्मशानभूमी नाही. यामुळे गावातील एखाद्याचा मृत्यू झाला तर मुख्य रस्त्याच्या कडेलाच सरण रचून पार्थिवावर अंत्यसंस्कार करावे लागतात.

माजलगाव (जि. बीड) - “इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते...” सुरेश भटांनी या कवितेतून मरणही सुसह्य असल्याचे सांगितले असले तरी मनूरवाडी (ता. माजलगाव) येथे मात्र मृत्यूनंतरही मरणयातना भोगण्याची वेळ आली आहे. गावाला स्मशानभूमीसाठी जागाच उपलब्ध नसल्याने चक्क रस्त्याच्या कडेलाच सरण रचून अंत्यविधी करावा लागतोय. 

देशासह महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात ग्रामीण भागातील खेड्यांचा मोठा वाटा असला तरी, खऱ्या अर्थाने विकासाला चालना देणारी खेडी आजही विकासापासून कोसोदूर आहेत. तालुक्यातील अनेक गावे, वाडी, वस्ती, तांड्यांवर आजही मूलभूत सुविधांचा मोठा अभाव असल्याचे चित्र पाहायला मिळतेय. शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर माजलगाव - मंजरथ रस्त्यावर मनूरवाडी (ता. माजलगाव) गाव वसलेले आहे. जेमतेम दोन, अडीच हजार लोकसंख्या असलेल्या मनूरवाडीत स्मशानभूमी नाही. यामुळे गावातील एखाद्याचा मृत्यू झाला तर मुख्य रस्त्याच्या कडेलाच सरण रचून पार्थिवावर अंत्यसंस्कार करावे लागतात.

हेही वाचा - हे तीन अ‍ॅप ठरले महत्त्वाचा दुवा - बीडमध्ये बाहेरून आलेल्या ७० हजार जणांची नोंद

ज्यांचे शेत जवळ आहे असे नागरीक शेतात अंत्यविधी करीत असले तरी बहुतांश अंत्यविधी हे रस्त्याच्या कडेलाच करण्याची वेळ नागरिकांवर येतेय. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी स्मशानभूमीसाठी अनेकांकडे जागा देण्याची विनंती केली; परंतु कोणीही यासाठी धजावत नसल्याचे दिसून आले. यामुळे गावापासून जेमतेम दोनशे, तीनशे मीटर अंतरावर मंजरथ रस्त्याच्या कडेलाच अंत्यविधीसाठी सरण रचावे लागत असल्याने मृत्यूनंतरही मरणयातना भोगण्याची वेळ येतेय. स्मशानभूमी शेडसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांतून होतेय. 

हेही वाचा - राजीनामा देऊन परतणारा डॉक्टर अपघातात जखमी

दफनविधीसाठीही एक किलोमीटरची पायपीट 
मनूरवाडीत मुस्लिम समाजही मोठ्या प्रमाणात वास्तव्य करीत असून त्यांच्या समाजासाठीही दफनभूमी नाही. या समाजातील एखाद्याचा मृत्यू झाल्यास दफनविधी करण्यासाठी एक किलोमीटर अंतरावरील कानोबाचा माळ येथे जावे लागते. 

पूर्वीपासूनच गावात स्मशानभूमी, दफनभूमीसाठी जागा उपलब्ध नाही. दोन्ही जागेसाठी दानपत्र देण्याबाबत अनेकांकडे विचारणा केली; परंतु ते मिळाले नाही. महसूल प्रशासनानेच आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी. 
- जयराम गायकवाड, सरपंच 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: मृत्यूनंतरही इथे भोगाव्या लागतात मरणयातना