COVID-19 : लातुरात आढळले 12 नवे कोरोना पॉझिटिव्ह

सुशांत सांगवे
सोमवार, 29 जून 2020

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत एकूण 179 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आज आले होते. त्यातील 143 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

लातूर : कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना लातूर शहरात 5, औसा तालुक्यात 6 आणि उदगीरमध्ये 1, असे 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण लातूर जिल्ह्यात सोमवारी (ता. 29) आढळून आले. या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत एकूण 179 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आज आले होते. त्यातील 143 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 11 जणांचे अहवाल अंतिम आले नाहीत तर 12 जणांचा अहवाल रद्द झाला आहे. त्यामुळे लातुर शहर आणि जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 337 झाली आहे. यातील 200 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. 121 जणांवर सध्या उपचार सुरू असून 16 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

तपासणीसाठी आलेल्या 179 स्वॅबमध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत तपासणीसाठी आलेल्या 51 जणांचा समावेश होता. त्यापैकी 42 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 4 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 3 व्यक्तींचे अहवाल अंतिम आले नाहीत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या या व्यक्ती शहरातील झिंग्नाप्पा गल्ली, मोती नगर आणि बिदर जिल्ह्यातील हुसनाल येथील आहेत. 

मुंबईतील 'या' भागातील मृत्यूदर जगाच्या दुप्पट तर देशाच्या तीप्पट...

महापालिकेकडून 29 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 26 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 2 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल अंतिम आला नाही. याशिवाय, औसा येथील 6 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. औसा तालुक्यातील सारोळा येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील 5 जण तर माळकोंडजी येथील एकाचा यात समावेश आहे. उर्वरित एक रुग्ण उदगीर तालुक्यातील वाढवणा येथील आहे, अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
 
लातूर : कोरोना मीटर

  • एकूण बाधित : 337
  • बरे झालेले : 200
  • उपचार सुरु : 121
  • मृत्यू : 16

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 12 new COVID-19 cases