esakal | दोन हजार विद्यार्थी एकाच वेळी अनुभवणार सूर्यग्रहण
sakal

बोलून बातमी शोधा

Latur News

सूर्यग्रहण पाहताना डोळ्यांना दुखापत होऊ शकते. उघड्या डोळ्यांनी हे ग्रहण पाहता येत नाही. ग्रहण म्हणजे नेमके काय? ते कसे घडते? याची माहितीही शालेय विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.

दोन हजार विद्यार्थी एकाच वेळी अनुभवणार सूर्यग्रहण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर : येत्या गुरुवारी (ता.26) होणारे सूर्यग्रहण महापालिकेतील विद्यार्थ्यांना पाहता यावे, याकरिता महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी अभिनव उपक्रम आयोजित केला आहे. सामाजिक संस्थेच्या मदतीने जिल्हा क्रीडा संकुलावर एकाच वेळी दोन हजार विद्यार्थ्यांना हे ग्रहण पाहता येणार आहे. त्यासाठी एमडीए फाउंडेशनच्या वतीने आवश्‍यक असणारे गॉगल आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. 

येत्या गुरुवारी सकाळी 8 ते 11 या कालावधीत सूर्यग्रहण पाहता येणार आहे. सूर्यग्रहण पाहताना डोळ्यांना दुखापत होऊ शकते. उघड्या डोळ्यांनी हे ग्रहण पाहता येत नाही. ग्रहण म्हणजे नेमके काय? ते कसे घडते? याची माहितीही शालेय विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. ही माहिती देण्यासोबतच विद्यार्थ्यांना ग्रहण पाहता यावे, यासाठी महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी एमडीए फाउंडेशन या संस्थेच्या सहकार्यातून हा उपक्रम आयोजित केला आहे. चांद्रयान मोहिमेत सहभाग घेतलेले भारतीय विज्ञानप्रसारक पराग गोरे हे यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करणार आहेत. 

हेही वाचा - कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही

सकाळी सात वाजता या अभिनव उपक्रमास प्रारंभ होणार आहे. आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्‌घाटन होणार आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास भारतीय विज्ञान प्रसारक आणि इस्रोच्या चांद्रयान मोहिमेत विद्यार्थीदशेत सहभाग नोंदविणारे पराग गोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा-

महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, मनपा आयुक्त एम. डी. सिंह, एमडीएम फाउंडेशनचे अध्यक्ष महेश आंबेकर, दिनेश आंबेकर या उपक्रमाचे समन्वयक ओमप्रकाश झुरुळे, रोटरी क्‍लब ऑफ लातूर मिडटाऊनचे अध्यक्ष शशिकांत मोरलावार, पालिकेचे शिक्षणाधिकारी डी. एच. सोनफुले, एमडीएम आंतरराष्ट्रीय विद्यालयाच्या प्राचार्य श्वेता गिल, रोटरीचे सचिव वीरेंद्र फुंडीपल्ले व कपिल पोकर्णा यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सुमारे 30 वर्षांनी कंकणाकृती ग्रहण

दहा वर्षांपूर्वी असे ग्रहण झाले होते. आता सुमारे 30 वर्षांनी कंकणाकृती ग्रहण होणार आहे. त्यामुळे हा दुर्मिळ योग असणार आहे. महापालिकेच्या 21 शाळांमधील एक हजार विद्यार्थ्यांना हे ग्रहण पाहण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. यासोबतच एमडीए इंटरनॅशनल स्कूलचे 600 विद्यार्थी व 400 पाहुण्यांसह जवळपास दोन हजार विद्यार्थी व नागरिक एकत्रितरीत्या हे ग्रहण पाहू शकणार आहेत. यासाठी एमडीए फाउंडेशनने सिल्व्हर पॉलिमर फिल्मचे विशिष्ट गॉगल उपलब्ध करून दिले आहेत. या गॉगलमुळे 99.9 टक्के सूर्यप्रकाश दिसत नाही. आयएसओ सर्टिफाइड असणाऱ्या या गॉगलमुळे अल्ट्रा व्हायोलेट किरणांपासूनही डोळ्यांचे रक्षण होते. 

सोलार कार्डही दिले जाणार

ग्रहणाच्या नोंदी करण्यासाठी विद्यार्थ्यांना सोलार कार्डही दिले जाणार आहेत. क्रीडा संकुलावर सूर्याच्या आकारतच उभे राहून विद्यार्थी हे ग्रहण पाहणार आहेत. अशा पद्धतीचा महाराष्ट्रातील हा पहिलाच उपक्रम असून यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांच्यासह एमडीए फाउंडेशन व रोटरी क्‍लबच्या वतीने करण्यात आले आहे. 

हेही वाचा - फटाका तोंडात फोडला...अन असे घडले...