नाव मोठं लक्षण खोटं, चौदा महिन्यांत एकच रुग्ण आयुष्मान!

योगेश पायघन
Friday, 29 November 2019

गेल्या चौदा महिन्यात जिल्ह्यातील केवळ एका रुग्णाला तर मराठवाड्यातील तीघांसह राज्याबाहेरील 28 कर्करोग रुग्णांना शासकीय कर्करोग रुग्णालयात आयुष्यमान भारत योजनेतून लाभ मिळाला आहे.

औरंगाबाद : आयुष्यमान भारत या महत्त्वाकांक्षी योजनेला 23 ऑगस्ट 2018 ला देशभरात सुरुवात झाली. त्यानंतर महिनाभराने घाटी व कर्करोग रुग्णालय तर त्यानंतर शहरातील पॅनलवरील 21 रुग्णालयांत ही योजना सुरु झाली. यात जिल्ह्यातील अडीच लाख कुटुंबांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात गेल्या चौदा महिन्यात जिल्ह्यातील केवळ एका रुग्णाला, तर मराठवाड्यातील तिघांसह राज्याबाहेरील 28 कर्करोग रुग्णांना शासकीय कर्करोग रुग्णालयात आयुष्यमान भारत योजनेतून लाभ मिळाला.

दोन लाख 37 हजार कुटुंबे, म्हणजे साधारण आठ लाख लोकांना या आरोग्य विमा योजनेचे कवच असल्याचा गाजावाजा करण्यात आला. दरम्यान, वर्ष सरल्यावर महापालिकेच्या यंत्रणेचे पितळही उघडे पडले. योजनेसाठी आवश्‍यक गोल्डकार्ड वितरणच न झाल्याचे समोर आल्याने वर्षभरानंतर एक ते आठ सप्टेंबर विशेष मोहीम राबवून गोल्ड कार्ड वितरित करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. मात्र, त्याचा किती फायदा झाला, काय निष्पन्न झाले हे सांगायला मात्र अधिकारी एकमेकांकडे बोटे दाखवत आहेत. 

जनआरोग्यच जास्त लाभदायी 

आयुष्यमानपेक्षा महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा (एमजेपीजेवाय) लाभ गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील 21 खासगी, तर घाटी व कर्करोग या शासकीय रुग्णालयांतून अधिक रुग्णांना मिळाल्याचे आकडे सांगतात. गेल्या वर्षभरात 22 हजार रुग्णांना एमजेपीजेवायचा लाभ मिळाल्याचे जिल्हा समन्वयक डॉ. श्रीनिवास मुंडे म्हणाले. राज्यातील चार, तर राज्याबाहेरील 28, अशा 32 रुग्णांना लाभ मिळाल्याचेही ते म्हणाले. मात्र, महापालिकेच्या विशेष मोहिमेची माहिती नसून, ते तेथील आरोग्य विभागाचे काम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

  • कर्करोग रुग्णालयात 32 जणांवर उपचार 
  • लाभार्थी 32 पैकी 28 इतर राज्यातील रुग्ण 
  • मराठवाड्यातील केवळ चार रुग्ण लाभार्थी 
  • 23 पैकी 22 रुग्णालयात नाही मिळाला लाभ 
  • महापालिका क्षेत्रातील गोल्ड कार्डबाबत एकमेकांकडे बोट 
  • दोन्ही योजनेतील पॅकेज अपडेट करण्याची गरज 

दीड लाखावर गोल्डकार्ड वितरण 

इतर राज्यांच्या अगोदर 2012 पासून राज्यात राजीव गांधी जीवनदायी योजना सुरु होती. तिचे पुढे नाव बदलले ती एमजेपीजेवाय झाली. योजना तीच आहे. त्यातून दीड लाखांपर्यंत उपचार मिळतो. दीड लाखांचे पॅकेज संपल्यावर आयुष्यमानचा लाभ मिळतो. मात्र, बहुतांश रुग्णांचे त्याच योजनेत भागत असल्याने आयुष्यमान कामी पडत नाहीत. तर जिल्ह्यातील बहुतांश राशनकार्ड धारकांना एमजेपीजेवायचा लाभ मिळतो. तर आयुष्यमानमध्ये केवळ 2.37 कुटुंब आहेत. त्यामुळे लाभधारकांची सख्या कमी असल्याचा दावा जिल्हा समन्वयक डॉ. श्रीनिवास मुंडे यांनी केला आहे. मात्र, घाटीसह इतर 21 खाजगी रुग्णालयात आयुष्यमानचा लाभ का दिला गेला नाही याबद्दल ते काहीच सांगू शकले नाहीत. तर जिल्ह्यात दीड लाखांवर गोल्ड कार्ड वितरित झाल्याचे त्यांनी सांगितले. 

हे वाचा - वाहनांना फास्टॅग अनिवार्य

आयुष्यमान योजनेसाठीचा आठ दिवसांचा स्पेशल ड्राईव्ह घेतला होता. योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. मुंढे या विशेष मोहिमेबद्दल सांगू शकतील. त्यातून किती फायदा झाला, गोल्ड कार्ड वितरणाची आकडेवारी सांगू शकतील, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर म्हणाल्या.

पॅकेज अपडेट गरजेचे

एमजेपीजेवाय योजनेतून लाभ मिळवून देण्यात शासकीय कर्करोग रुग्णालयाचा राज्यात दुसरा क्रमांक लागतो. दिवसेंदिवस कर्करोगात औषधी अपडेट होत आहे. त्या अपडेट औषधी योजनेच्या पॅकेजमध्ये नसल्याने त्या औषधी खाजगीतून खरेदी कराव्या लागतात. त्यामुळे पॅकेज व पॅकेजमधील औषधींमध्ये अपडेशन होण्याची गरज असल्याचे तज्ज्ञ सांगतात. 

कर्करोग रुग्णालयाचा पत्रव्यवहार

सहा महिन्यांपूर्वी योजनेच्या अधिकाऱ्यांशी भेट झाली. त्यावेळी बैठकीत तांत्रिक अडचणी व कर्करोगाची 30 प्रकारच्या औषधी अपडेट करण्यासाठी कर्करोग रुग्णालयाने पत्रव्यवहार केला असल्याचे कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले. वरिष्ठांना यासंबंधी माहीती दिली असून, त्यावर निर्णय अपेक्षित असल्याचे डॉ. मुंढे म्हणाले.

हेही वाचा - बालाघाटच्या रानमेव्याची वाटसरूंना गोडी

आज घेणार आढावा

आयुष्यमान भारत आरोग्य योजनेचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाच्या एनएचआरएलचे सेंट्रल व पूर्व झोनचे स्पेशल रॅपो ऑफिसर डॉ. विनोद अग्रवाल शनिवारी (ता. 30) शहरात येणार आहेत. ते घाटी व शासकीय कर्करोग रुग्णालयासह महापालिका, खाजगी इम्पॅनल रुग्णालयांचा आढावा घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 32 Patient treated in PM-JAY at cancer hospital Aurangabad