औरंगाबादमध्ये डेंगीचा कहर कायमच

माधव इतबारे
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

 • अकरा दिवसांत आढळले तब्बल 46 रुग्ण 
 • साथ रोखण्यात महापालिकेचे प्रयत्न अपुरे 

औरंगाबाद - शहरातील डेंगीची साथ रोखण्यासाठी महापालिकेचे गेल्या एक ते दीड महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत; मात्र दिवसेंदिवस डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे.

गेल्या अकरा दिवसांतच तब्बल 46 जणांना डेंगीची लागण झाल्याचे सोमवारी (ता. 11) समोर आले. त्यामुळे शहरात डेंगीचा धोका कायम आहे. 
डेंगीने गेल्या महिन्यात सात जणांचे बळी घेतल्याने खळबळ उडाली. ऑगस्ट महिन्यात डेंगीचे आठ रुग्ण होते, तर संशयितांची संख्या 99 होती. सप्टेंबरमध्ये 22 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सुमारे 200 रुग्ण संशयित आढळले; मात्र महापालिकेने ही आकडेवारी गंभीरपणे घेतली नाही. त्यामुळे डेंगी बळी गेला. त्यानंतर मात्र महापालिकेच्या आरोग्य
विभागाला जाग आली व उपाययोजना सुरू करण्यात आल्या. त्यानंतर तब्बल सहा जणांचे बळी गेले.

हेही वाचा - महाराष्ट्रात कधी, का लागली होती राष्ट्रपती राजवट? जाणून घ्या... 

त्यानंतर महापालिकेने ऍबेटिंग, डोअर टू डोअर सर्वेक्षण, डास उत्पत्तीच्या स्थळांची तपासणी, पाण्याचे कंटेनर्स तपासण्याची मोहीम हाती घेतली; मात्र यानंतरही ऑक्‍टोबरमध्ये तब्बल 85 जणांना डेंगीची बाधा झाली, तर 382 संशयित आढळले. नोव्हेंबर महिन्यात अकरा दिवसांतच डेंगीचे तब्बल 46 रुग्ण आढळले आहेत. संशयित रुग्णांचा आकडा मात्र कमी 99 एवढा आहे. यामुळे आरोग्य विभागाची चिंता पुन्हा वाढली आहे. शहरात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे जागोजागी पाण्याची डबकी साचून होती. त्यातूनच डासांची उत्पत्ती वाढली, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. 

हेही वाचा -  हृदयद्रावक : परतीच्या पावसाचा बळी, गेवराईत शेतकऱयाने संपवले जीवन

दहा वर्षांतील  सर्वाधिक रुग्ण 
2016 मध्ये डेंगीमुळे 14 जणांचा मृत्यू झाला होता; मात्र रुग्णांची संख्या 100 होती, तर संशयित 277 एवढे आढळले होते. यंदा मात्र डेंगीच्या रुग्णांची संख्या 174, तर संशयितांची संख्या तब्बल 791 एवढी झाली आहे. ही संख्या दहा वर्षांतील सर्वाधिक आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

हेही वाचा -  सडलेलं पीक बघून काळीज पिळवटून जातंय

 
डेंगीची लक्षणे   

 • अचानक थंडी वाजून येऊन प्रखर ताप येणे 
 • डोके, हातापायात प्रचंड वेदना होणे 
 • अशक्तपणा येणे, भूक न लागणे, 
 • मळमणे कोणत्याच पदार्थाची चव न येणे 
 • गळा दुखणे, गळ्यात काटा टोचल्यासारखे वाटते 
 • सर्वांगावर लाल सुरकुत्या पडून प्रचंड वेदना होणे 
 • ...अशी घ्या काळजी
 • आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळा 
 • जादा काळ पाणीसाठा होऊ देऊ नका 
 • घराजवळील डबकी बुजवावीत 
 • आपला परिसर स्वच्छ ठेवा 
 • शरीरावर पूर्ण कपडे वापरावेत 
 • मच्छरदाणीचा वापर करावा 
 • जुने टायर, भंगार साहित्य नष्ट करा 
 • ताप आल्यास तत्काळ डॉक्‍टरांकडे जा 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 46 Dengue patients in Aurangabad