महाराष्ट्रात कधी, का लागली होती राष्ट्रपती राजवट? जाणून घ्या...

विकास देशमुख
Monday, 11 November 2019

महाराष्ट्रात 17 फेब्रुवारी 1980 ते 9 जून 1980 पर्यंत राष्ट्रपती राजवट होती. तसेच 2014 मध्ये 32 दिवसांसाठी अर्थात 28 सप्टेंबर 2014 ते 31 ऑक्‍टोबर 2014 या काळात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

औरंगाबाद - राज्यात सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांनी शिवसेनेला आज (सोमवारी) सायंकाळपर्यंत मुदत दिली होती. पण कॉंग्रेसची भूमिका अद्याप स्पष्ट नसल्याने त्यांच्या पाठिंब्याचे पत्र शिवसेनेला अद्याप मिळाले नाही. त्यामुळे शिवसेनेला सत्ता स्थापन करता आली नाही. परिणामी, राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने यापूर्वी राज्यात कधी आणि का राष्ट्रपती राजवट लागली होती याचा eSakal.com ने आपल्या वाचकांसाठी घेतलेला खास आढावा. 
  
महाराष्ट्रात दोन वेळा लागली होती राष्ट्रपती राजवट 
महाराष्ट्रात यापूर्वी दोनवेळा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. 17 फेब्रुवारी 1980 ते 9 जून 1980 या काळात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर 2014 मध्ये 32 दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट लागली होती. ऐंशीच्या दशकात समाजवादी कॉंग्रेस स्थापन करीत शरद पवार यांनी राज्यातील पुलोद सरकारचे नेतृत्व केले होते. पण, त्यावेळी इंदिरा गांधी यांनी राज्यातील पुलोद सरकार बरखास्त करून त्याकाळी विधानसभेच्या मध्यवर्ती निवडणुका घेतल्या.

त्यामुळे महाराष्ट्रात 17 फेब्रुवारी 1980 ते 9 जून 1980 पर्यंत राष्ट्रपती राजवट होती. तसेच 2014 मध्ये 32 दिवसांसाठी अर्थात 28 सप्टेंबर 2014 ते 31 ऑक्‍टोबर 2014 या काळात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसने सहकारी पक्ष कॉंग्रेसचा पाठिंबा काढल्याने सरकार कोसळले. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. 
  
इंदिरा गांधी नेमकी का लागू केली होती राष्ट्रपती राजवट? 
वर्ष 1975 च्या आणीबाणीनंतर देशभरात इंदिरा गांधी आणि कॉंग्रेस विरोधात लाट होती. एवढेच नाही तर कॉंग्रेसमध्येही आणीबाणीवरपण दुफळी निर्माण झाली होती. इंदिरा गांधी यांच्या विरोधी गटाने यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने रेड्डी कॉंग्रेस या पक्षाची स्थापना केली. शरद पवार यांनीही रेड्डी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर वर्ष 1978 च्या विधानसभा निवडणुका झाल्या. त्यावेळी 7 मार्च 1978 ला रेड्डी कॉंग्रेसचे वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले; पण हे सरकार अल्प काळच टिकले.

पुढे पवारांनी समाजवादी कॉंग्रेसची स्थापना करत 18 जुलै 1978 ला पुरोगामी लोकशाही दलाच्या (पुलोद) नावाखाली सत्ता स्थापन केली. यामध्ये जनता पक्ष, समाजवादी कॉंग्रेस, शेकाप आणि कम्युनिस्ट पक्ष सहभागी झाले होते. दरम्यान, त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा कॉंग्रेसला घवघवीत यश मिळाले. इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या. देशाची सूत्रे त्यांच्या हाती आली. दुसरीकडे जनता पक्षात बंडखोरी झाली. शिवाय राज्यातील काही खासदारांनी महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करण्याची मागणी केंद्राकडे केली. त्या आधारे 17 फेब्रुवारी 1980 ला इंदिरा गांधींच्या शिफारशीनंतर राज्यात राष्ट्रपतींनी पुलोदच सरकार बरखास्त करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली. 

हेही वाचा - मुदतीत सरकार स्थापन करण्यात शिवसेना अपयशी; काँग्रेस, राष्ट्रवादीचे तळ्यात मळ्यात 
 

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? 
देशातील कोणत्याही राज्यात शासकीय कारभार संविधानानुसार चालणे शक्‍य नसल्याचा अहवाल संबंधित राज्याच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींना दिला किंवा तसा अहवाल नसतानाही राष्ट्रपतींची स्वत:ची तशी खात्री पटली, तरी राष्ट्रपती त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. 

शिवसेना एनडीएतून बाहेर; अरविंद सावंत यांचा राजीनामा सुपूर्द


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When was the President's rule implemented in Maharashtra