हृदयद्रावक : परतीच्या पावसाचा बळी, गेवराईत शेतकऱयाने संपवले जीवन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 November 2019

कर्जबाजारीपणा, नापिकीने आत्महत्या

गेवराई (जि. बीड) - कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे शेतकऱ्याने गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. 11) सकाळी तालुक्यातील माटेगाव येथे घडली. राजेंद्र किसनराव टेकाळे (वय 43) असे मृताचे नाव आहे.

राजेंद्र यांच्या शेतीपिकांचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले. त्यांच्याकडे सहकारी व सरकारी बँकेचे कर्ज आहे. नापिकीमुळे कर्ज फेडण्याच्या चिंतेतून त्यांनी हे पाऊल उचलले.त्यांच्या पाश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. 
 

अपेक्षेवर फेरले पाणी
तालुक्‍यात गेल्या हंगामात पाऊस नसल्याने खरिपाबरोबर रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होऊन खर्चही निघाला नाही. पाणी, पशुधनाचा प्रश्‍न गंभीर झाला होता. या परिस्थितीत यंदा खरीप हंगामात जूनअखेर पाऊस झाल्याने पिकांची परणी करून आर्थिक पुंजी बी-बियाणांवर खर्च करून टाकली होती. यंदाच्या हंगामातील पिके चांगली येतील, या आशेवर पिकांना
खत-पाण्यावर भरमसाट खर्च केला; पण रिमझिम पावसावरच पिकांची वाढ झाली नाही. मात्र, पोळ्यानंतर दमदार पाऊस झाल्याने पिके जोमात वाढली. आता चांगले उत्पन्न निघणार या आशेवर शेतकरी मेहनत करत होतो.

ऑक्‍टोबरच्या सुरवातीला बाजरी, मका, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, सोयाबीन, करळ पिकांची काढणी तर कापूस पिकांची वेचणी सुरू होणार होती. या पिकाच्या उत्पन्नातून किमान पिकावर खर्च झालेला खर्च तरी निघणार, या आशेवर शेतकरी समाधानी होता; पण पंधरा दिवसांपासून परतीच्या पावसाने दमदारपणे हजेरी लावत धो-धो बरसला. त्यामुळे खरिपाच्या हंगामातील पिकांना कोंब आले. त्यामुळे सोयाबीन, मका, कपाशी या सर्व पिकाचे नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत.

हेही वाचा - सडलेलं पीक बघून काळीज पिळवटून जातंय

मराठवाड्यात सोयाबीनची नासाडी 
परतीच्या पावसामुळे सर्वाधिक सोयाबीन पिकाला फटका बसला असून, मराठवाड्यातील 14 लाख 29 हजार हेक्‍टर सोयाबीन पिकाची अक्षरश: नासाडी झाली आहे. या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. सोयाबीनपाठोपाठ कापसाचे 11 लाख 42 हजार हेक्‍टर, तर मका पिकाचे 2 लाख 32 हजार हेक्‍टर नुकसान झाले आहे. पंचनामे अंतिम
टप्यात असून, हे आकडे वाढतील, अशी शक्‍यता महसूल विभागाकडून व्यक्‍त करण्यात आली आहे. 
 
मराठवाड्यातील 156 लघू-मध्यम धरणे जोत्याखालीच
आता पिण्याचे पाण्याचे काय? असा प्रश्‍न बहुतांश भागांतील नागरिकांसमोर उभा होता; मात्र परतीच्या पावसाने पाणीसाठ्यांमध्ये मोठी वाढ झाली असून, मराठवाड्यातील 873 प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा शुक्रवारी (ता. आठ) 70.84 टक्‍यांपर्यंत गेला आहे. तथापि, प्रकल्पांपैकी 63 लघू-मध्यम प्रकल्पांना अजूनही पाण्याची प्रतीक्षा असून 156 प्रकल्पांतील पाणीसाठा अजूनही जोत्याखालीच असल्याने 'कहीं खुशी, कहीं गम' अशी स्थिती आहे. 

हेही वाचा
बीड जिल्ह्यात भीषण अपघात, आठ जण ठार; दोघे जखमी
गॉगलवाले खासदार आत्ता शेतकऱ्यांच्या भेटीला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer's suicide in Beed district