esakal | चक्क वनविभागाचे बनावट कार्यालय थाटून बेरोजगारांना ८२ लाखाचा गंडा

बोलून बातमी शोधा

file photo

या दहा जणांच्या पालकांकडून ८२ लाख रुपये उकळून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. यात एका पालकाच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

चक्क वनविभागाचे बनावट कार्यालय थाटून बेरोजगारांना ८२ लाखाचा गंडा

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : आम्ही वन विभागातील अधिकारी आहोत असे भासवून भामट्यांनी नांदेडच्या दहा बेरोजगार मुलांना वन विभागात फिल्ड ऑफिसरची नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. या दहा जणांच्या पालकांकडून ८२ लाख रुपये उकळून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. यात एका पालकाच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद येथील एका वर्तमानपत्रात जाहिरात देऊन संपर्कासाठी नांदेड शहरातील छत्रपती चौकातील पत्ता दिला. तक्रारदार याने दिलेल्या फोन नंबरवर विचारणा केली असता नांदेड येथेच कार्यालय असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर तक्रारदार कमलाकर जायभाये यांनी नांदेडच्या कार्यालयात संपर्क साधला. 

बनावट वन विभागाचे कार्यालय थाटले

यावेळी छत्रपती चौकात भारतीय वन विभाग अशा नावाने कार्यालय दिसले. यातील शामला मुळे आणि शहाजी बालाजी मुळे यांनी त्यांचे बनावट वनविभाग केंद्र सरकारचे ओळखपत्र दाखविले. एवढेच नाही तर शामला मुळे ह्या भारतीय वन विभाग महाराष्ट्र राज्याचे इंचार्ज अधिकारी तसेच मंगला जाधव ह्या मुंबई विभागाच्या इन्चार्ज आहेत. व इतर व्यक्ती हे लिपिक असल्याचे भासविले. 

हेही वाचाCorona : कोरोनापासून बचावासाठी विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल, कोणती ते वाचाच

वन विभागात २३५ लोकांची नोकर भरती करावयाची आहे

तसेच त्यांनी वनविभागाचे बनावट नियुक्तीपत्रही तयार करून आम्ही केंद्राचे सरकारी नोकर आहोत, असे दाखविले. वन विभागात २३५ लोकांची नोकर भरती करावयाची आहे. त्यासाठी फॉर्म भरुन लेखी परिक्षा होणार आहे. दिल्लीतील थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ओळखी असल्याने अनेकांना वन विभागात नोकरी लावलेली आहे. असे विश्‍वासात घेऊन कमलाकर जायभाये यांच्याकडून १२ लाख रुपये घेतले. तसेच त्यांच्या नातेवाईकाकडून प्रत्येकी दहा ते बारा लाख असे ८२ लाख रुपये जमा केले. सर्वांना बनावट नियुक्तीपत्रक दिले. 

तब्बल ८२ लाख रुपये उकळले

ही धक्कादायक बाब लक्षात आली. त्यानंतर नांदेडमधील सर्व भामटे पसार झाले. फिर्यादीच्या नातेवाइकांना अमरावती व यवतमाळ जिल्हा परिषदेत लिपिकपदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून (ता.१५) मार्च २०१५ ते (ता. २०) फेब्रुवारी २०१६ या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणच्या दहा बेरोजगार मुलांच्या पालकांकडून त्यांनी तब्बल ८२ लाख रुपये उकळले. परंतु, नोकरीच्या नावाखाली आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पालक कमलाकर नारायण जायभाये (रा. नागरवाडी, ता. लोहा) यांनी भाग्यनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

येथे क्लिक करा धक्कादायक...! परिक्षा पर्यवेक्षकांवर फौजदारी गुन्हे

यांच्यावर झाला फसवणुकीसह आदी कलमान्वये गुन्हा दाखल

यावरून शामला बालाजी मुळे, शहाजी बालाजी मुळे, सिमा बालाजी मुळे (वणवे), हेमा बालाजी मुळे सर्व राहणार नांदेड, मंगला संजय जाधव, राकेश सदाशिव धोंडगे रा. नाशिक, शिवाजी किशन खांडरे रा. हदगाव, राम अण्णाजी घाटे रा. अमरावती आणि वर्धा येथील श्री. काळे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अनिरूद्ध काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण करत आहेत.