बीड जिल्ह्यात मग्रारोहयोतील २९ तांत्रिक अधिकाऱ्यांना घरचा रस्ता 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

  • जिल्हाधिकारी रेखावार व सीईओ कुंभार यांची कारवाई 
  • एकिकडे कंत्राटी सेवेत; दुसरीकडे बेरोजगार अभियंता 
  • शासनाची दिशाभूल केल्याने कारवाई, सुशिक्षीत अभियंता प्रमाणपत्रही रद्द 

बीड - एकिकडे कंत्राटी का होईना शासन सेवेत असताना दुसरीकडे सुशिक्षीत बेरोजगार अभियंता म्हणून शासकीय कामे करत शासनाची दिशाभूल करणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील २९ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती करुन घरचा रस्ता दाखविण्यात आला. जिल्हाधिकारी राहूल रेखावार व मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही कारवाई केली.

विशेष म्हणजे बांधकाम विभागाने दिलेले सुशिक्षीत अभियंता प्रमाणपत्रही रद्द करण्यात आले. यातील १९ जण जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारितील अस्थापनेत तर १० जण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अत्यारित असलेल्या अस्थापनेवर कंत्राटी सेवेत होते. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत काम करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने तांत्रिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. ही नियुक्ती करत असताना संबंधित उमेदवारांनी शपथपत्र देऊन मी अन्य कोठेही काम करत नाही, असे शासनास सांगावे लागते. या हमीपत्र आधारित त्यांना शासन सेवेत सामावून घेतले जाते. अशी खोटी शपथपत्रे देऊन ही मंडळी कंत्राटी शासकीय सेवेत होती.

मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास

मात्र, याच कालावधीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, बीड आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, अंबाजोगाई याठिकाणी सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून प्रमाणपत्रे घेऊन त्या ठिकाणी हे लोक गुत्तेदारी व्यवसाय करत होते. जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी सोमवारी (ता. १५) यातील १९ लोकांना सेवेतून कमी केले. तर, तर मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी १० कंत्राटी तांत्रिक सहाय्यकांना सेवेतून मुक्त केले. दरम्यान, या सर्व लोकांना सार्वजनिक बांधकाम विभाग बीड व सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई यांनी दिलेले सुशिक्षित बेरोजगार अभियंता प्रमाणपत्रही रद्द करण्यात आले. 

कोरोनाच्या महामारीतही कारवाई 
कोरोना महामारीत सेवामुक्त करु नये, असे संकेत आणि नियम असले तरी शासनाची दिशाभूल केल्याचे समोर आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

होय, मृत्यू जवळ आला की हत्ती करतो आत्महत्या, वाचा रंजक माहिती  

या तांत्रिक सहाय्यकांवर झाली कारवाई (कंसांत पंचायत समिती) 
आर. एस. आघाव, के. जी. राऊत (केज), ए. बी. दरेकर व एस. जी. तळेकर, (पाटोदा), डी. यु. सानप, एस. ए. अन्सारी, एस. एम. खाकरे (तिघेही शिरुर कासार), आर. आर. दराडे (अंबाजोगाई), एस. ए. खोड, वाय. ए. जाधव, व्ही. एच. अंधारे, एन. एम. घोडके (बीड), व्ही. व्ही. लासिनकर, एस. डी. गायकवाड, श्रीमती आर. आर. केकाण, आर. जी. घुमरे, ए. डी. वदक, ए. एस. पवार (गेवराई), मधुकर इंगळे, मंगेश सानप, बाळकृष्ण ढाकणे, अजय बारगजे, शेख मोहम्मद मोईनोद्दीन अमीनोद्दीन, विश्वनाथ बडे, रवींद्रकुमार राख, बबन सुपेकर, विशाल तांदळे, विशाल सानप. 

 

असेच आणखी ३० ते ४० कंत्राटी तांत्रिक सहाय्यक शासनाची दिशाभूल करुन विविध ठिकाणी सेवेत आहेत. त्यांच्यावरही कारवाई होईपर्यंत पाठपुरावा सुरुच राहील. 
- ॲड. अजीत देशमुख, तक्रारदार. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action taken for misleading the government, well-educated engineer certificate also canceled