कळंबच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती

दिलीप गंभीरे
Friday, 11 December 2020

कृषी उत्पन्न बाजार  समितीची २०१५ ते २०२० कार्यकाळातील संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कार्यकाळ २९ नोव्हेंबर रोजी संपुष्टात आला होता.

कळंब: कळंबच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपला असून 1 डिसेंबर रोजी बाजार समितीच्या प्रशासक म्हणून सहायक निबंधक (सहकार) बी एस कटकदौंड यांची प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. त्यांनी प्रशासक म्हणून पदभार घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.

कृषी उत्पन्न बाजार  समितीची २०१५ ते २०२० कार्यकाळातील संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कार्यकाळ २९ नोव्हेंबर रोजी संपुष्टात आला. दरम्यान विद्यमान संचालक मंडळाने मुदतवाढ मागितली होती. जिल्हा उपनिबंधक अधिकाऱ्यांनी मुदतवाढीचा प्रस्तावदेखील पणन व सहकार विभागाकडे दाखल केला होता.मात्र संचालक मंडळाच्या मुदत वाढीचा प्रस्ताव फेटाळण्यात आला.

औशातील सहा युवकांनी उभी केलेली 'माणुसकीची भिंत' देतेय गरजूंना आधार

राज्यातील काही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत वाढवून दिल्याचा दाखला देत कळंब च्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने न्यायालयात धाव घेतल्याची माहिती भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील गटाचे तत्कालीन सभापती रामहरी शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे बाजार समितीचा कारभार नक्की कोणाकडे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

२०१५ झालेल्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सद्या भाजप गटाचे १५, शिवसेनेचे एक काँग्रेस पक्षाचे पण सध्याचे शिवसेनेचे दोन संचालक निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बहुमत असल्याने पक्षाचा सभापती,उपसभापती अशी निवड झाली होती. या संचालक मंडळाची पाच वर्षाची मुदत संपली आहे.

साखरपुड्यात होणारा बालविवाह रोखला, जाफराबाद पोलिसांची सजगता

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने स्थानिक स्वराज्य, सहकारी संस्थांच्या निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलला होता. परिणामी विद्यमान संचालक मंडळाने मुदत वाढवून मागितली होती. पण शासनाने मुदत वाढवून दिली नाही. शासनाकडून मुदत वाढवून न दिल्याने जिल्हा उपनिबंधक अधिकाऱ्यांनी पत्र पाठविले आहे. विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपला असून मुदतवाढ देणे शक्य योग्य नसल्याने प्रशासकामार्फत कारभार करणे योग्य राहील,असे पत्रात नमूद करत शासनाच्या मान्यतेने प्रशासक म्हणून सहायक उपनिबंधक याची नियुक्ती करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Administrator The Agricultural Income Market Committee of Kalamb