अपघातानंतर पुलावरून खाली कोसळलेल्या तरूणाचा मृतदेह मिळाला, मृत तरुण दाळींबचा रहिवाशी

अविनाश काळे
Tuesday, 8 December 2020

दुचाकीच्या अपघातातून पुलाखालील पाण्यात पडलेल्या तरूणाचा मृतदेह मंगळवारी (ता.आठ) दुपारी दोन वाजता बाहेर काढण्यात आला.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : दुचाकीच्या अपघातातून पुलाखालील पाण्यात पडलेल्या तरूणाचा मृतदेह मंगळवारी (ता.आठ) दुपारी दोन वाजता बाहेर काढण्यात आला. दरम्यान सोमवारी (ता. सात) सांयकाळी साधारणतः सात वाजण्याचा सुमारास उमरग्याहुन दाळींबकडे निघालेल्या तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वहानाने धडक दिल्यानंतर तो राष्ट्रीय महामार्गावरील जकेकूर गावाजवळील पुलावरून खाली पाण्यात कोसळला, परंतू ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. मात्र तो तरूण मृतावस्थेत आढळून आला.
याबाबतची प्राथमिक माहिती अशी की, दाळींब येथील ईस्माईल खय्युम उमापुरे (वय २६) हा टेम्पोचालक  काही कामानिमित्त सोमवारी उमरगा शहरात आला होता.

काम आटोपून तो दुचाकीवरून सांयकाळी गावाकडे निघाला होता. सातच्या सुमारास जकेकूर येथील पुलावर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. हा अपघात नेमका कसा झाला याची अद्याप माहिती प्राप्त झालेली नसली तरी अपघातानंतर तो पुलाखालील पाण्यात कोसळला. मात्र या दुर्देवी घटनेची माहिती तातडीने कळू शकली नाही. अथवा ही घटना निदर्शनास आली नाही. ईस्माइलला पोहता येत होते. परंतू जवळपास तो ४० ते ५० फुट खोल पाण्यात पडल्याने त्याच्या पाण्याला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो पाण्यातील मोबाईल केबलचा आधार घेऊन जीव वाचविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

दरम्यान ईस्माईल गावाकडे आला नसल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली. मंगळवारी सकाळी नऊ वाजता पुलावर एक दुचाकी, चप्पल पडल्याचे लक्षात आले. परंतू अपघातानंतर त्याला जखमी अवस्थतेत कुणीतरी रुग्णालयात नेले असावे म्हणून शोधाशोध केली. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबा जाफरी, ख्यय्यूम चाकूरे, हन्नान पटेल आदींनी पोलिसात माहिती दिली. पोलिस निरीक्षक मुकुंद आघाव, बीट अंमलदार श्री. शिंदे, कांतू राठोड, जकेकूरचे उपसरपंच अनिल बिराजदार यांच्यासह श्री. जाफरी घटनास्थळी गेले. दोन मच्छिदारानी पाण्यात उतरून मृतदेहाचा शोध घेतला आणि मोबाईलच्या केबलला धरलेल्या अवस्थेतील इस्माईलचा मृतदेह दुपारी दोन वाजता बाहेर काढण्यात आला. सांयकाळी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. रात्री दाळींब येथे त्याच्यावर शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Accident Youth Dead Body Found Umarga News