esakal | बावीस दिवसांच्या लढाईनंतर ६० वर्षीय महिलेची कोरोनावर मात

बोलून बातमी शोधा

udgir news
बावीस दिवसांच्या लढाईनंतर ६० वर्षीय महिलेची कोरोनावर मात
sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (लातूर): कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.... त्यातच दम लागत असल्याने चिंता वाढली.. एचआरसीटीचा स्कोर बारा आल्याने धडकी भरली.. बेड मिळत नसल्याच्या परिस्थितीत तब्बल बावीस दिवस कोरोनाशी लढून शहरालगत असलेल्या मलकापूर येथील एका साठ वर्षीय महिलेने यशस्वी मात केली आहे. या महिलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

राज्यासह सगळीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूचेही प्रमाण वाढत आहे. अशातच ग्रामीण भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक मृत्यू हे भीतीमुळे होत असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने केले आहे. अशातच काही रुग्ण हे इतर रुग्णांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याने या संसर्गजन्य परिस्थितीत असे यशस्वी मात केलेले रुग्ण मोलाची बाब ठरत आहेत.

हेही वाचा: औरंगाबादमध्ये मद्य विक्रेत्यांचा धुमाकूळ; होम डिलेव्हरी ऐवजी थेट विक्री

शहरालगत असलेल्या मलकापूर येथील ग्रामपंचायत सदस्या प्रभावती मनोहर पवार (वय-६०) यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना दम लागत असल्याने येथील सामान्य रूग्णालयातील कोरोना केअर रुग्णालयात दोन एप्रिल रोजी दाखल करण्यात आले. त्यांची एचआरसीटी तपासणी केली असता त्यांचा स्कोर बारा आला. त्यांना ऑक्सिजनची गरज पडल्याने ऑक्सिजन लावण्यात आले दिवसेंदिवस त्यांची परिस्थिती ढासळत होती.

पाच लिटर ऑक्सिजनपासून सुरूवात झाली. त्यांना दिवसेंदिवस ऑक्सिजनचा पुरवठा वाढवावा लागला. पंचवीस लिटर ऑक्सिजन देऊनही त्यांना अडचण येऊ लागली परिस्थिती ढासळत असल्याने सर्व नातेवाईकाच्या चिंतेत भर पडली. तब्बल अठरा दिवस ऑक्सिजनवर ठेवूनही त्या रिकव्हर होत नव्हत्या. शेवटी त्यांना व्हेंटिलेटर लावावे लागले.

हेही वाचा: Corona Updates: दिलासादायक! बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाची निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सतीश हरिदास व कोरोना रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ शशिकांत देशपांडे वर डॉ स्वप्नील घाटगे यांच्या टीमने ऑक्सीजनसह, रेमडेसिव्हिर इंजेक्शन दिले होते. मात्र यादरम्यान शेवटपर्यंत या महिलेचा धीर खचला नव्हता.दोन दिवसाच्या वेंटिलेटर उपचारानंतर या महिलेच्या ऑक्सिजन पातळीत वाढ झाली. प्रचंड इच्छाशक्तीमुळे या महिलेने कोरोनावर मात केली. या संसर्ग परिस्थितीत दहशतीच्या वातावरणामध्ये इतर रुग्णांसाठी या महिलेने आदर्श निर्माण केला आहे.

न घाबरता कोरोनाशी लढा...

"माझ्या आईचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मी घाबरून गेलो पण माझ्या आईने धीर सोडला नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील यांच्या मदतीने मी आईला शासकीय रुग्णालयात दाखल करून दररोज दोन टाईम अंडे, सकस आहार दिला. घरचा डबा दिला, वेळप्रसंगी कोरोना वार्डात जाऊन माझ्या आईचे मनोबल वाढवले. न घाबरता कोरोनाशी लढल्यास निश्चितपणे विजयी मिळतो हे माझ्या आईने दाखवून दिले आहे."

-गजानन पवार, (मुलगा)