पुतळे उभारणीसोबतच विचारांचीही पेरणी आवश्यक

प्रमोद चौधरी
Sunday, 5 January 2020

महापुरुषांनी दाखविलेल्या मार्गावरून जिवनाची वाट चोखाळावी, यासाठी पुतळे उभे केले जातात. मात्र, भारतीय राजकारणात पुतळ्यांचा वापर सातत्याने न्यूनतम स्तरावरील राजकारणासाठी केला जात आहे, हेच आपल्या व्यवस्थेचे दुर्दैव आहे.

नांदेड : समाजोपयोगी कामांचाआदर्श समाजाच्या किंबहुना शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक-युवतींच्यासमोर रहावा, यासाठी महापुरुषांचे पुतळे उभे केले जातात. परंतु, पुतळे उभारणी करण्यासाठी राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व निर्माण होत असल्याने मूळ उद्देशच बाजूला राहत आहे. पुतळे जरूर उभारले पाहिजेत, त्यात दुमत नाहीच. मात्र, ते निःस्वार्थ वृत्तीने उभारून थोरांच्या विचारांचीही पेरणी समाजात करणे आज पुतळे उभारण्याइतकेच गरजेचे झाले आहे.

सद्यस्थितीत भारतातील राजकारणात पुतळ्यांना अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यातल्या त्यात महापुरुषांच्या पुतळ्यांना तर जास्तच आहे. त्यांच्या विचारांपेक्षा त्यांच्या मूर्ती आणि उत्सव यातच त्यांच्या अनुयायांना बंदिस्त करून ठेवण्याचे हित विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून सध्या सुरु आहे. शहरातील रस्ते, नाल्या, जलवाहिनी आदींच्या समस्या भेडसात आहेत. महापालिकेची तिजोरी रिकामी असल्याचे कारण सांगत या विकास कामांना मंजुरी मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक निवडणुकांमध्ये मतदारांना कसे सामोरे जावे, याची चिंता प्रत्येक पक्षाला लागून असते. 

हेही वाचा ‘प्रोफेशनल’ फोटोग्राफीत सावित्रीच्या लेकीची उडी !

मतांच्या गणितातून पुतळ्यांचे राजकारण
विशिष्ट समाजाच्या भावनांना फुंकर घालण्यासाठी पुतळे बसविले जातात. एखाद्या विशिष्ट समाजासाठी आम्ही काही तरी करीत आहोत, असे दाखविण्यासाठी पुतळे बसविणे सोपे असते. उत्कृष्ट नागरी सुविधा पुरवून मतदारांची मते वळविण्यापेक्षा पुतळे बसवून विशिष्ट समाजाची एकगठ्ठा मते मिळविणे, हे पुतळे उभारणीमागचे मुख्य कारण आहे. मतांच्या या गणितातूनच पुतळ्यांचे राजकारण केले जात असल्याचे सध्याचे चित्र दिसून येत आहे.

हे देखील वाचा ‘एकात्मिक रोग’ सर्वेक्षणात नांदेडची भरारी

विचारांची पेरणी आवश्यक
योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने आजचा युवक भरकटत चालला आहे. त्यामुळे अशा युवकांना फुले-शाहू-आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्यासारख्या महापुरुषांच्या विचारांची गरज आहे. परंतु, हल्ली त्याकडे कुणालाच लक्ष देण्यास वेळ नसल्याचे त्याचे परिणाम देशासह समाजालाही भोगावे लागत आहेत. म्हणून, एखादा समाजाची मने जिंकण्यासाठी जयंती-पुण्यतिथी साजरे करण्यापुरते पुतळे नकोत; तर सोबतच त्यांच्या विचारांचाही जागर होणे आवश्यक आहे. कारण समाजोपयोगी कामांचा आदर्श समोर रहावा यासाठी महापुरुषांचे पुतळे उभे केले जातात. महापुरुषांनी दाखविलेल्या मार्गावरून जिवनाची वाट चोखाळावी, अशी वृत्ती यातून अपेक्षित असते. मात्र, भारतीय राजकारणात पुतळ्यांचा वापर सातत्याने न्यूनतम स्तरावरील राजकारणासाठी केला जात आहे, हेच आपल्या व्यवस्थेचे दुर्दैव आहे.

नांदेडातील प्रेरणादायी पुतळे
०- लालबहाद्दूर शास्त्री
०- रवींद्रनाथ टागोर
०- अण्णाभाऊ साठे
०- महाराणा प्रताप
०- नरहर कुरुंदकर
०- छत्रपती शिवाजी महाराज
०- महात्मा गांधी
०- सरदार वल्लभभाई पटेल
०- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
०- छत्रपती शाहू महाराज
०- महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले
प्रस्तावित पुतळे
०- महात्मा बसवेश्वर
०- वसंतराव नाईक

हेही बघितलेच पाहिजेVideo : उनको तलाश किसी बेवफा की थी : नाराज आमदार गोरंट्याल देणार राजीनामा?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Along with the installation of statues, the sowing of thoughts is also necessary