बीड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका उतरल्या कोरोनाच्या लढाईत 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

अंगणवाडीताईंचे काम थांबले नाही. त्यांनी आता महामारीच्या संकटाशी दोन हात करताना ‘कर्तव्य’ म्हणून स्वतःचा संसार, जिवाची पर्वा न करता घरोघरी जाऊन कोरोनाचा सर्व्हे करण्याचे काम सुरू ठेवले आहे.

जवळगाव (जि. बीड) -  कोरोना या महामारीच्या संकटामुळे अंगणवाड्या बंद आहेत. मात्र, अंगणवाडीताईंचे काम थांबले नाही. त्यांनी आता महामारीच्या संकटाशी दोन हात करताना ‘कर्तव्य’ म्हणून स्वतःचा संसार, जिवाची पर्वा न करता घरोघरी जाऊन कोरोनाचा सर्व्हे करण्याचे काम सुरू ठेवले आहे. प्रत्येक घरातील आरोग्याची माहिती सरकारला त्यांच्यामुळे मिळण्यास मदत होत आहे.

कारखान्याला गेलेले ऊसतोड मजूर शासनाने आदेश दिल्यामुळे आपल्या गावाकडे येत असून आरोग्य विभाग व ग्रामसेवक, तलाठी आशाताई, अंगणवाडी सेविका यांनी भेट देऊन माहिती घेतली. आपल्या कुटुंबाची उपजीविका भागविण्यासाठी कुटुंबासह कारखान्यावर गेले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कारखान्यास शासनाने बंदीचा आदेश दिल्याने कारखाने बंद करण्यात आले. त्यामुळे मजुरांनाही काम मिळत नव्हते. मजुरांना गावाकडे जाण्याची ओढ लागली होती परंतु जिल्हाबंदीचा आदेश असल्यामुळे त्यांना गावाकडे येता येत नव्हते.

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

जवळगाव येथील मजूर सांगली जिल्ह्यातील कारखान्यास ऊस तोडण्यासाठी गेले होते. शुक्रवारी (ता.१) सकाळी जवळगावला दाखल झाले. तीन महिला, तीन पुरुष, दोन लहान मुली यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्वारंटाइन केले आहे. सध्या सर्वत्र लॉकडाउनची स्थिती निर्माण झाली आहे. त्याअंतर्गत सध्या शाळा, अंगणवाड्या बंद आहेत. त्यामुळे अंगणवाड्या सेविकांचे काम मात्र बंद नाही. त्यांना शासनाने आशा स्वयंसेविकांच्या बरोबरीने त्यांना आरोग्याचा सर्व्हे करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही तशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार त्यांनी या कामाला हे आमचे काम नाही, असा नकार न देता आलेल्या जागतिक संकटाशी दोन हात करण्यासाठी कर्तव्य म्हणून काम सुरू केले आहे. त्यासाठी त्या सकाळी आठ वाजताच घरातून बाहेर पडून आपले कर्तव्य निःसंकोचपणे निभावत आहेत.

 

हेही वाचा - अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, पण हे क्षेत्र तारणार...

आशा स्वयंसेविकांच्या बरोबरीने त्यांनीही जिवाची पर्वा न करता घरोघरी जाऊन कोरोनाचा सर्व्हे सुरू केला आहे. सामाजिक बांधिलकीतून त्यांनी स्वतःच्या संसाराचा गाडा बाजूला ठेवून या महत्त्वाच्या कामाला प्राधान्य दिले आहे. गावातील अंगणवाडी सेविका दररोज घरोघरी जाऊन त्यांच्या घरात कोणी आजारी आहे का? कोणाला सर्दी, ताप, खोकला आहे का? याची माहिती देऊन आरोग्यविषयक जनजागृती करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे प्रत्येक घरातील आरोग्याची माहिती सरकारला मिळण्यास मदत होत आहे. 

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

क्वारंटाइन नागरिकांवर लक्ष 
अंगणवाडी सेविका गुणवंता भडके, मंडाबाई यादव, सारिका आटुळे, ऊर्मिला जाधव, आशा स्वयंसेविका लता आदमाने, मीरा टेकाळे, लता बनसोडे, रुमा घायाळ, आरोग्य कर्मचारी सविता माळवे, शीला गाडवे या जवळगाव येथील २१९ क्वारंटाइन केलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anganwadi workers from Beed district landed in the battle of Corona