महापालिकेच्या रुग्णालयातील स्वच्छतेवर महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीची नाराजी

हरी तुगावकर
गुरुवार, 12 एप्रिल 2018

या रुग्णालयाचा परिसरातील स्वच्छता पाहून या रुग्णालयात रुग्णांनी उपचारासाठी यायचे की आपले आरोग्य धोक्यात घालण्यासाठी यायचे असा सवालच या महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीने केला आहे. 

लातूर - येथील पटेल चौकात महापालिकेचे जुने रुग्णालय आहे. या
रुग्णालयाला महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीने गुरुवारी (ता. 12) भेट देवून पाहणी केली. पण या रुग्णालयाचा परिसरातील स्वच्छता पाहून या रुग्णालयात रुग्णांनी उपचारासाठी यायचे की आपले आरोग्य धोक्यात घालण्यासाठी यायचे असा सवालच या समितीने उपस्थितीत करून महापालिका या रुग्णालयाकडे किती गांभिर्याने पाहते यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

लातूर जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, महसूल विभाग, राज्य उत्पादन शुल्क, परिवहन विभाग यासह अनेक विभागाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समिती बुधवारपासून (ता. 11) लातूर दौऱयावर आहे. या समितीचे अध्यक्ष आमदार अनिल कदम हे आहेत. बुधवारी या समितीने शासकीय विश्रामगृहात सर्वच विभागाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी औसा येथे झालेल्या विविध कामांना भेटी दिल्या. गुरुवारी दुपारी महापालिकेच्या कामांना या समितीने भेटी दिल्या आहेत. यात पटेल चौकात महापालिकेचे रुग्णालय आहे. सर्वात जुने रुग्णालय म्हणून या रुग्णालयाची ओळख आहे. गरीबांचे रुग्णालय म्हणून याकडे पाहिले जाते.

पण येथे सुविधांचा अभाव आहे. रुग्णालयाचा परिसर स्वच्छ असणे आवश्यक असते पण या रुग्णालयाच्या परिसरात मोठी अस्वच्छता या समितीला दिसून आली. त्यामुळे या समितीच्या सदस्यांनी रुग्णालयात रुग्णांनी आरोग्य धोक्यात घालण्यासाठी यायचे का? असा सवालच उपस्थित केला. यावेळी महापालिकेचे अधिकारी मात्र गप्प बसू होते.
त्यानंतर या समितीने रुग्णालयाच्या सुरु असलेल्या बांधकामाला भेट दिली. या बांधकामाचे प्लिंथलेवलचा 74 लाखाचे बील अदा करण्यात आले आहे. यावरही समितीने उपस्थित केलेल्या प्रश्नाला अधिकारी उत्तर देवू शकले नाहीत. त्यानंतर या समितीने वरवंटी शिवारातील कचरा डेपोला भेट देवून पाहणी केली तशाच काही सूचनाही केल्या.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Angered by Maharashtra Legislative Assessment Committee on cleanliness of municipal hospitals