अन् अत्तराच्या सुगंधाची दरवळही झाली कमी 

कैलास चव्हाण  
शुक्रवार, 22 मे 2020

दरवर्षी रमजान महिन्यात बाजारपेठेत सुगंधी साधने, अत्तर खरेदीसाठी होणारी गर्दी यंदा कोरोनाच्या संकटामुळे नाहीशी झाली आहे. रमजान महिन्यात परभणीची बाजारपेठ ग्राहकांविना सुनीसुनी पडली आहे. 

परभणी ः सुगंध सर्वांनाच हवाहवासा असतो. सण, उत्सव असला की सुगंधाचे स्थान अबाधित आहे. मन सुवासिक करण्यासाठी विविध प्रकारच्या सुगंधी साधनाचा वापर होतो. दरवर्षी रमजान महिन्यात बाजारपेठेत सुगंधी साधने, अत्तर खरेदीसाठी होणारी गर्दी यंदा कोरोनाच्या संकटामुळे नाहीशी झाली आहे. गर्दीही नाही अन् सुगंधही नाही, अशी स्थिती सध्या बाजारात निर्माण झाली आहे.

परफ्युम, बॉडी स्प्रेच्या युगातही पारंपरिक अत्तराचे स्थान अजूनही कायम आहे. लग्नसोहळा, सण, उत्सव यामध्ये कपड्यावर अत्तर लावले जाते किंवा कानात अत्तराचे फाये लावले जातात. मुस्लिम धर्मात अत्तराला महत्त्वाचे स्थान आहे. रमजान महिण्यात ठिकठिकाणी होणाऱ्या इफ्तार पार्ट्यात प्रेमभाव व्यक्त करण्यासाठी सुगंधी अत्तर आलेल्या पाहुण्यांना लावले जाते. तसेच दररोजही अत्तराचा वापर केला जातो. खास करून ईदच्या दिवशी प्रत्येक मुस्लिम बांधव अत्तराचा वापर करतात. त्यामुळे या महिन्यात अत्तराला मोठी मागणी असते. 

हेही वाचा - प्रकल्पांतील पाणीसाठ्यामुळे परभणी जिल्ह्याला यंदा ‘नो टेन्शन’ 

भारतीय कंपन्यांसह विदेशी कंपन्यांचे अत्तर विक्रीला 
दरवर्षी परभणीच्या बाजारात भारतीय कंपन्यांसह विदेशी कंपन्यांचे अत्तर विक्रीला येत असते. मुंबई, हैदराबाद, कन्नोज, रतलाम यासह सौदी अरेबिया या देशातूनही अत्तर मागविले जाते. तसेच या वेळी जदेगा, गुलाब, बिंधास हे अत्तर खास फ्रान्स येथून येत असते. मदिना येथून हारमाईन हे अत्तर मागविले जाते. रतलाम, नियामत, नायब, अल-नमि, कशीश, अरारहिब फरास, बिंदास्त, शहाजह, गुलाब, रेहाब, चमेली, चंदण, केशर, मॅगनेट, हिना, जन्नतुल फिरदोस, मस्क असे अत्तराचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध होत असते. त्यामुळे दरवर्षी रमजान महिना सुरू होताच शहरातील बाजारात ठिकठिकाणी अत्तराचा सुगंध दरवळत असतो.

हेही वाचा -औरंगाबाद शिक्षण मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय, कोणता?

व्यापाऱ्यांनी मार्चपूर्वीच अत्तर मागविले
यंदा मात्र लॉकडाउन असल्याने बाजारपेठ बंद आहे. रमजान महिना संपत आला आहे. सोमवारी (ता. २५) ईद आहे. मात्र, अजूनही लॉकडाउनमुळे बाजारात दुकाने उघडली नसल्याने अत्तराचा सुगंध निर्माण झालाच नाही. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल थांबली आहे. त्यामुळे परभणीच्या अपना कॉर्नर, जनता मार्केटमध्ये अत्तराचा सुगंध नाहीसा झाला आहे. शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी मार्चपूर्वीच अत्तर मागविले होते. परदेशातून अत्तर मागविण्यासाठी किमान दोन ते तीन महिने आधीच मागणी करावी लागते. त्यामुळे लाखो रुपये गुंतवून विक्रेत्यांनी अत्तर आणले आहे. परंतु, दुकाने उघडली नसल्याने त्याची विक्रीच झाली नाही.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Aroma Of Perfume Also Decreased, parbhani news