युरिया खताचा कृत्रिम तुटवडा

तानाजी जाधवर
Friday, 17 January 2020

रब्बी हंगामातील पिके जोमात आली आहेत. शेतकरी खताची खरेदी करीत आहेत; मात्र खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र भासवून काही विक्रेत्यांकडून चढ्या दराने विक्री सुरु असल्याचे वृत्त आहे.

उस्मानाबाद : यंदा रब्बी हंगामातील पिके जोमात आहेत. त्यामुळे शेतकरी विविध रासायनिक खतांची खरेदी करीत आहेत. मात्र काही दिवसांपासून युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

दुसरीकडे काही विक्रेते चढ्या दराने खताची विक्री करीत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी कराव्यात, त्यांच्या भागामध्ये तत्काळ खताचा पुरवठा करण्यासंदर्भात उपाययोजना करण्यात येतील, असे जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी सांगितले. 

जिल्ह्यात ऑक्‍टोबर महिन्यामध्ये झालेल्या पावसानंतर शेतकरी रब्बी हंगामातील पिकाकडे वळले होते. गहू व ज्वारी ही मुख्य पिके घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गव्हाचे पीक चांगले बहरले आहे; मात्र ढगाळ वातावरणामुळे गहू पिकाची वाढ खुंटल्याचे दिसून येत आहे. साहजिकच शेतकऱ्यांतून युरियाची मोठी मागणी होत आहे.

काही इंटरेस्टिंग बातम्या -

इब्राहिमखान गारद्याचे अस्सल चित्र औरंगाबादेत, मूळ गाव कोणते? 

पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम? जाणून घ्या... 

या ठिकाणी आहे थोरले बाजीरावांची समाधी, झाली दुरवस्था, पाहा PHotos

युरियाची आवश्‍यकता भासत असल्याने शेतकरी कृषी केंद्रात जाऊन युरियाबाबत विचारणा करीत आहेत; मात्र युरिया उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून युरियाची टंचाई निर्माण झाली आहे. युरियाच्या एका बॅगची किंमत 266 रुपये आहे. त्यापुढील रक्कम शासन थेट कंपन्यांना देते. साधारण आठशे ते साडेआठशे एवढी रक्कम पोत्यामागे शासन अनुदानापोटी देते. मात्र शेतकऱ्यांना युरिया खरेदी करण्याची वेळ असताना त्यांना प्रतीक्षा करावी लागत असल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.

प्रत्येक हंगामातच काही विक्रेत्यांकडून युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचे प्रकार निदर्शनास येतात. तसेच चढ्या भावाने विक्री केली जात असल्याचे वृत्त आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. 

पॉस मशीनमुळे गोंधळ 
पॉस मशीनच्या नोंदीची माहिती घेतली असता युरिया खताचा साठा उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले. मात्र त्यात गोदामात माल नसल्याची तांत्रिक चूक अनेकदा शेतकऱ्यांसाठी अडचणीची ठरत आहे. मागणी करूनही खत साठा उपलब्ध होत नसल्याची तक्रार कृषी केंद्र विक्रेते करीत आहेत. 

 

युरिया खताची टंचाई निर्माण झाल्यास त्याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे रीतसर तक्रार दाखल करावी. त्या भागातील विक्रेत्यांना तत्काळ खताचा पुरवठा करण्याची सोय केली जाईल. शेतकऱ्यांना युरिया खत कमी पडू दिले जाणार नाही. 
- तानाजी चिमणशेट्टी, कृषी विकास अधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Artificial breakdown of urea fertilizer