साठेबाजी, नफाखोरी करणाऱ्यांवर कारवाईचा अशोक चव्हाण यांचा इशारा...

अभय कुळकजाईकर
Monday, 30 March 2020

जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी व नफाखोरी करुन चढ्या भावाने विक्री केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे. त्याचबरोबर याबाबत तत्काळ लक्ष देण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

नांदेड - कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत काही ठोक व किरकोळ व्यापारी जीवनावश्यक वस्तुंचा साठेबाजी व नफाखोरी करून तो चढ्या भावाने विकत असल्याच्या तक्रारी येत असल्याने अशा व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला सोमवारी (ता. ३०) दिले आहेत.

मागील दोन आठवड्यांपासून पालकमंत्री नांदेड शहरात तळ ठोकून आहेत. जिल्हाधिकारी व जिल्ह्यातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत त्यांच्या दररोज बैठकी होत असून, कोरोनाला रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर ते बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विविध विभागाच्या मंत्र्यांशीही श्री. चव्हाण नियमित संपर्कात आहेत व उपाययोजनांच्या माहितीची देवाणघेवाण सुरू आहे.

हे ही वाचा - कॉँग्रेस, शिवसेनेचा नांदेडमध्ये रक्तदानासाठी पुढाकार

साठेबाजी खपवून घेणार नाही 
दरम्यान, काही ठोक व किरकोळ व्यापारी गहू, तांदूळ, ज्वारी, डाळी, तेल व इतर जीवनावश्यक वस्तुंची साठेबाजी करत आहेत तसेच चढ्या भावाने विक्री करीत असल्याच्या तक्रारी त्यांच्याकडे आल्या आहेत. साठेबाजी होत असल्यामुळे अनेकांना चढ्या भावाने जीवनावश्‍यक वस्तू खरेदी कराव्या लागत आहेत. त्यामुळे काही नागरिक संताप व्यक्त करून तक्रारी करत आहेत. संपूर्ण जग कोरोनासारख्या वैश्विक संकटाशी लढत असताना साठेबाजी व नफेखोरीसारखे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

‘वर्क फॉर्म होम’च्या सूचना
नांदेड जिल्ह्यात सुदैवाने कोरोना संसर्ग झालेला एकही रूग्ण नसला तरी खबरदारीची उपाययोजना म्हणून जनतेने ‘वर्क फॉर्म होम’च्या सूचनेचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्यावर कोरोनाची लागण होऊ शकते त्यामुळे याबाबत काळजी घेणे आवश्‍यक आहे. नागरिकांनी घरात बसून राहणे गरजेचे आहे. विनाकारण बाहेर जाऊन दुकानांवर खरेदीसाठी गर्दी करु नये. घरपोच आवश्यक साहित्य देण्यासाठी महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत अंतर्गत व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

हे ही वाचलेच पाहिजे - आपत्ती व्यवस्थापनात कार्यरत ग्रामसेवकांचा विमा करा मंजूर

उपाययोजनांचे काटेकोर पालन करा
अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. छोट्या-मोठ्या गल्लीबोळांमध्ये एकत्रित होऊन गर्दी करू नये. नागरिकांच्या सुरक्षेसाठी शासन व प्रशासन रात्रंदिवस काम करीत असून, कोरोनामुळे भयभीत न होता सर्व प्रकारच्या प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर पालन करावे आणि स्वतःची काळजी घ्यावी.
- अशोक चव्हाण, पालकमंत्री, नांदेड. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashok Chavan warns against betting, profiteering ..., nanded news