आणखी दोन कावळ्यांचा मृत्यू, 'बर्ड फ्लू'ने की अन्य कारणाने?

निसार शेख
Tuesday, 12 January 2021

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ब्रम्हगाव व पांगूळगव्हान येथील कोंबड्या व अंडे विक्रीस प्रतिबंध करण्यात आला आहे.

कडा (जि.बीड) : आष्टी व पाटोदा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या मुगगाव येथे 11 कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाला आहे. याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असतानाच मंगळवारी (ता.12) आष्टी तालुक्यातील ब्रम्हगाव येथे सकाळी 10 च्या सुमारास दोन कावळे मृत्यूमुखी पडल्याने आष्टी तालुक्यात खळबळ उडाली आहे. नेमके या दोन कावळ्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू'ने की अन्य कोणत्या कारणांमुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

देशातील दहा राज्यात बर्ड फ्लूचे संकट घोंघावत असतानाच मंगळवारी (ता.12) मूगगाव पाठोपाठ आष्टी तालुक्यातील ब्रम्हगाव येथे दोन कावळ्यांच्या मृत्यू झाल्याने आष्टीचे प्रभारी तहसीलदार शारदा दळवी यांनी बर्ड फ्लू चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आष्टी तहसील कार्यालयात पशुधन आधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन सूचना दिल्या. या बैठकीत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ब्रम्हगाव व पांगूळगव्हान येथील कोंबड्या व अंडे विक्रीस प्रतिबंध करण्यात आला आहे.

शेतकरी कुटुंबांनी केली काळ्याआईची पूजा; बैलगाडीतून प्रवास

बर्ड फ्लू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनानं तातडीनं हालचाली सुरू केल्या असून आष्टी तालुक्यातील ब्रम्हगांव, कऱ्हेवाडी,पांगुळगव्हाण, कासेवाडी,आंबेवाडी, शेकापूर, देसुर,हाजीपूर, भाळवणी या गावांचा समावेश आहे. या 12 गावांना कंन्टेन्मेंट झोन घोषित केले असून पक्षी मृत झाल्यास परस्पर विल्हेवाट न लावता पशुसंवर्धन विभागास तात्काळ कळवावे असे आवाहन पशुधन विकास अधिकारी मंगेश ढेरे यांनी केले आहे.

बर्ड फ्लू च्या भीतीने चिकन दुकाने ओस-
बर्ड फ्लूच्या धास्तीने आष्टी तालुक्यातील कडा धानोरा धामणगाव पिंपळा दौलावडगाव व इतर गावातील चिकनच्या दुकानाकडे पाठ फिरवल्याने दुकाने ओस पडली आहेत. कोरोना पाठोपाठ बर्ड फ्लू चे संकट ओढवल्याने चिकन व्यावसायिक तसेच कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आले आहेत.

मराठवाड्याच्या आणखी बातम्या वाचा

'बर्ड फ्लू' च्या अनुषंगाने बीडचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आष्टी तालुक्यातील ब्रम्हगाव व पांगुळगव्हान या गावासह परिसरातील 12 गावे कंन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात आले असून शासनाच्या आदेशाचे सर्वांनी पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.
- शारदा दळवी ( प्रभारी तहसिलदार, आष्टी)

(edited by- pramod sarawale) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ashti news 2 craws died latur news bird flu