
नांदेड जिल्ह्यातील बिलोलीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेपासून ते पुढे अमेरिकेत उच्च शिक्षण घेऊन सध्या नवी दिल्लीच्या राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या (आयसीएमआर) साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख असलेल्या पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांचे नाव कोरोनाच्या लढ्यात अग्रभागी आहे.
डॉ. गंगाखेडकर यांच्या निमित्ताने नांदेडचा झेंडा पुन्हा एकदा देशभरात फडकला आहे.
नांदेड - जगभरात पसरत असलेल्या कोरोनाविरुद्धची लढाई जोरात सुरु आहे. भारतात देखील कोरोनावर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. अनेक दिग्गज त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. त्यापैकीच एक असलेले पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांचे नाव अग्रभागी घ्यावे लागेल. आनंदाची विशेष घटना म्हणजे डॉ. गंगाखेडकर यांचे बालपण आणि महाविद्यालयापर्यंतचे शिक्षण नांदेड जिल्ह्यातील बिलोली आणि धर्माबादला झाले आहे.
कोरोनाच्या संदर्भातील बातम्यांमध्ये विशेष करुन भारतातील घडणाऱ्या घडामोडींमध्ये प्रसारमाध्यमातून दररोज पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांचे नाव नेहमी सर्वांच्याच समोर येत आहे. कोरोनाच्या लढ्यातील ते एक प्रमुख सेनानी आहेत. नवी दिल्लीच्या राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या (आयसीएमआर) साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. नांदेड जिल्ह्यात बालपण घालविलेल्या डॉ. गंगाखेडकर यांनी त्यांच्या या जुन्या आठवणींना नुकताच एका मुलाखतीत उजाळा दिला होता.
हेही वाचा - दिलासादायक : गृहमंत्री म्हणतात...प्रादुर्भाव कमी तिथे उद्योगांना सूट
डॉ. रमण यांचे झाले बिलोली, धर्माबादला शिक्षण
डॉ. रमण गंगाखेडकर यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यावेळी ते दहावीच्या परिक्षेत गुणवत्ता यादीत आले होते. त्यानंतर त्यांनी धर्माबाद येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात सायन्सला प्रवेश घेतला. बीएस्सी प्रथम वर्ष झाल्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी अंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश घेतला. त्यानंतर दुसऱ्या वर्षीपासून ते औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेले तिथे पदवी आणि पदव्युत्तरचे शिक्षण घेऊन ते डॉक्टर झाले.
औरंगाबाद ते दिल्ली असा झाला प्रवास
औरंगाबादला वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राज्यात नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ न्यूट्रीशनबाबत काम केले. नंतर इन्स्टिट्यूट आॅफ ह्यूमन आॅनाटॉमी विभागात काम केले. त्यानंतर ‘नारी’ संस्थेतही ते काही दिवस होते. त्यानंतर डॉ. गंगाखेडकर हे नवी दिल्लीला राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन संस्थेत (आयसीएमआर) रूजू झाले. त्यानंतर त्यांनी जगातील नामांकित असलेल्या अमेरिकेतील जॉन हाफकीन विद्यापीठात पब्लिक हेल्थ विषयात मास्टर पदवी मिळवली. शासनाने त्यासाठी त्यांची निवड करुन अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवले होते. त्यामुळे जिल्हा परिषद शाळा बिलोली ते अमेरिका असा त्यांचा प्रवास थक्क करणारा तर आहेच पण त्यासोबतच सर्वांसाठी प्रेरणादायी असा आहे. त्यांच्या संशोधन क्षेत्रातील कार्याची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे. त्यामुळे नांदेडकरांना त्यांचा निश्चितच अभिमान आहे.
हेही वाचलेच पाहिजे - शासकीय कार्यालयांमध्ये सोमवारपासून दहा टक्के उपस्थिती
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात अग्रभागी
कोरोना विषाणूच्या लढ्यात भारतात वेगवेगळ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यापासून ते सध्याच्या परिस्थितीत सुरु असलेल्या खबरदारीच्या विविध उपाययोजना राबविण्याबाबत असलेल्या अग्रेसरांमध्ये डॉ. रमण गंगाखेडकर यांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल. त्यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तींच्या मार्गदर्शनामुळे कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव इतर देशांच्या तुलनेत भारतात कमीच आहे. कोरोनाचा धोका ओळखून या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात लॉकडाउनची घोषणा केली आहे. कोरोनापासून वाचायचे असेल तर विलगीकरणावर अधिकाअधिक भर द्यावा. नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि लॉकडाउनला साथ द्यावी, असे आवाहन देखील पद्मश्री डॉ. गंगाखेडकर यांनी केले आहे.