esakal | औरंगाबादेत ७२ शिक्षक पॉझिटिव्ह, मनपा हद्दीतील शाऴा तीन जानेवारीपर्यंत बंद, ग्रामीणमध्ये सोमवारपासून सुरू 
sakal

बोलून बातमी शोधा

school test chavhan.jpg

जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना शाळा सुरु होण्याआगोदर आरटीपीसीआर टेस्ट करणे अनिवार्य करण्यात आले होते. त्यासाठी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील नववी ते बारावी पर्यंत शिकवणारे ८ हजार ८१८ शिक्षक, २६६५ शिक्षकेतर कर्मचारी अशा एकुण ११, ४८३ जणांची कोरोना चाचणी करण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून आरोग्य विभागाच्या मदतीने करण्यात आले होते. त्यानुसार आत्तापर्यंत मनपा क्षेत्रात ६५; तर ग्रामीण भागातील सात शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. 

औरंगाबादेत ७२ शिक्षक पॉझिटिव्ह, मनपा हद्दीतील शाऴा तीन जानेवारीपर्यंत बंद, ग्रामीणमध्ये सोमवारपासून सुरू 

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : खेड्यात ऑनलाईन माध्यमांची उणीव आहे. शिक्षणात नेटवर्कच्याही समस्या असून शाळाच शिक्षणाचे चांगले माध्यम आहे. आता जिल्ह्यात कोरोनाचा एकही कंटेन्मेंट झोन नाही. त्यामूळे ग्रामीण भागातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या ८२४ शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सोमवारपासून (ता.२३) सुरु करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला. यासंदर्भात जिल्हाधिकारी निवासस्थानी चव्हाण यांनी शनिवारी (ता.२१) पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडे, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांची उपस्थिती होती.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, शहरी आणि ग्रामीण भागातील परिस्थिती समस्या वेगवेगळ्या आहेत. ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या घटत असून रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्के आहे. तसेच शहरापेक्षा ग्रामीण भागातील मृत्यूदरही कमी आहे. मुलांच्या शिक्षणासाठी शाळाच सर्वात उत्तम माध्यम आहे. ग्रामीण भागात मोबाईल, इंटरनेट यासारख्या तांत्रिक अडचणी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मुले शिक्षणापासून वंचित राहात आहेत, परिणामी, शाळाबाह्य होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये २३ नोव्हेंबर पासून सुरु करण्याच्या अनुकूल निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
 
शाळा सुरु करण्याची पुर्वतयारी म्हणून ग्रामीण भागातील ७ हजार १३० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तपासणी नियोजनबद्ध पद्धतीने पुर्ण केली जात आहे. शनिवार (ता.२१) दुपारपर्यंत साडेचार हजार शिक्षकांची तपासणी झालेली असुन त्यातून फक्त ९ शिक्षक कर्मचारी डॉझिटीव्ह आले आहेत. २३ तारखेपर्यंत सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या तपासण्या पुर्ण होतील. शिक्षकांना आरटीपीसीआर तपासणी शिवाय शाळेत जाता येणार नाही. विद्यार्थांना शाळेत येण्यासाठी पालकाचे संमत्तीपत्र अनिवार्य असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मनपा हद्दीतील शाळा ३ जानेवारीपर्यंत बंद 
मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडे म्हणाले की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष महत्वाचे आहे. मात्र, जीवन अमुल्य आहे. शहरातील बाधितांच्या संख्येतील वृद्धी आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता मनपा हद्दीत शाळा विद्यार्थांसाठी तीन जानेवारीपर्यंत बंद राहतील. शाळा बंद, शिक्षण सुरु या उपक्रमासाठी शाळेत शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती असणार आहे. शाळा सुरु करण्याबाबतची पडताळणी १० डिसेंबरला करण्यात येणार असल्याचे श्री. पांडे यांनी सांगीतले. 
 
शहरात ५०; तर ग्रामीणमध्ये शंभर टक्के शिक्षकांची उपस्थिती आवश्यक 
येत्या २३ नोव्हेंबरपासून ग्रामीण भागात शाळा, महाविद्यालये सुरु होणार आहेत. त्यासाठी शंभर टक्के शिक्षकांना शाळेत उपस्थित राहावे लागणार आहे. तर शहरी भागात ‘शाळा बंद पण शिक्षण सुरु’ असा पुर्वीप्रमाणेच उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यानुसार ५० टक्के शिक्षकांना उपस्थिती राहावे लागणार आहे. ग्रामीण भागातील सर्व शिक्षकांना आरटीपीसीआर टेस्ट करावीच लागणार आहे. तर मनपा हद्दीतील शिक्षकांसाठी कोरोना टेस्ट ऐच्छिक करण्यात आली आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

जिल्ह्यात ७२ शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह 
जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना शाळा सुरु होण्याआगोदर आरटीपीसीआर टेस्ट करणे अनिवार्य करण्यात आले होते. त्यासाठी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील नववी ते बारावी पर्यंत शिकवणारे ८ हजार ८१८ शिक्षक, २६६५ शिक्षकेतर कर्मचारी अशा एकुण ११, ४८३ जणांची कोरोना चाचणी करण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून आरोग्य विभागाच्या मदतीने करण्यात आले होते. त्यानुसार आत्तापर्यंत मनपा क्षेत्रात ६५; तर ग्रामीण भागातील सात शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. 

(संपादन-प्रताप अवचार)