रिक्षासोबत क्‍यूआर कोडचे जुळेना! 

अनिल जमधडे
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

 

  • आरटीओची अनास्था कायमच 
  • पोलिसांसोबत संयुक्त मोहिमेची गरज 
  • सुरक्षेचा उद्देश सफल होईना 
     

औरंगाबाद - सुरक्षिततेच्या दृष्टीने तयार केलेले क्‍यूआर कोड स्टिकर्स लावण्यास रिक्षाचालक उत्सुक नाहीत. त्यामुळे रिक्षाला क्‍यूआर कोड लावल्याशिवाय फिटनेस तपासणी न करण्याचा निर्णय आरटीओ कार्यालयाने घेतला आहे. दररोज फिटनेस तपासणीला येणाऱ्या अवघ्या पंचवीस ते तीस रिक्षांनाच क्‍यूआर कोड लावण्यात येत आहेत. त्यामुळे शहरातील संपूर्ण रिक्षांना क्‍यूआर कोड लावण्यासाठी पाच वर्षेही कमी पडतील, अशी स्थिती आहे. 

ऑटोरिक्षा आणि टॅक्‍सीचालकांकडून प्रवाशांसोबत अरेरावी व असभ्य वर्तनाच्या घटना सातत्याने घडत असतात. त्यामुळेच राज्य परिवहन प्राधिकरण समितीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना क्‍यूआर कोड स्टिकर्स लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रिक्षा, टॅक्‍सी, कुल कॅब या वाहनांमध्ये परवानाधारक, चालक यांची माहिती तसेच वाहनाचा क्रमांक, परवाना क्रमांक, वैधता, आपत्कालीन मदतीसाठी व तक्रारीसाठी हेल्पलाइन क्रमांक व मोबाईल ऍप दर्शविणारे क्‍यूआर कोड असलेले स्टिकर प्रवाशांना सहज दिसेल अशा पद्धतीने लावण्याचा निर्णय आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी औरंगाबाद आरटीओ कार्यालयाने सर्वप्रथम पुढाकार घेतला. मात्र, तरीही केवळ फिटनेसला येणाऱ्या दररोज पंचवीस ते तीस रिक्षांना स्टिकर्स बसवले जात आहेत. शहरात जवळपास तीस हजारांच्या जवळपास रिक्षा आहेत. दररोजची गती बघता शहरातील संपूर्ण रिक्षांना स्टिकर्स लावण्यासाठी पाच वर्षांपेक्षाही जास्त काळ लागणार आहे. 

हेही वाचा : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना 819 कोटींची मदत 

मोहिमेची गरज 

रिक्षांना क्‍यूआर कोड स्टिकर्स लावण्यासाठी आरटीओ आणि पोलिसांनी संयुक्त मोहिमा राबविण्याची गरज आहे. मोहिमेत रस्त्यावरच्या प्रत्येक रिक्षाला क्‍युआर कोड लावल्याशिवाय रस्त्यावरून जाताच येणार नाही, अशी व्यवस्था करण्याची गरज असताना, आरटीओ कार्यालयाचे काम कासवगतीने सुरू आहे. सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेला अत्यंत स्तुत्य उपक्रम असताना आरटीओच्या अनास्थेमुळे योजनेचा बोजवारा उडाला आहे. 

क्‍लिक करा : औरंगाबाद जिल्हा परिषदेत पुन्हा महिलाराज, यांना मिळू शकते संधी 

दंडात्मक कारवाईची तरतूद 

रिक्षामध्ये क्‍यूआर कोडचे स्टिकर्स न लावणाऱ्या चालकांना दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. पहिल्या गुन्ह्यासाठी एक हजार रुपये दंड किंवा पाच दिवस परवाना निलंबित, दुसऱ्या गुन्ह्यासाठी तीन हजार रुपये दंड किंवा दहा दिवस परवाना निलंबित आणि तिसऱ्या गुन्ह्यासाठी पाच हजार रुपये दंड किंवा पंधरा दिवस परवाना निलंबित करण्याची तरतूद आहे. 

हेही वाचा : आधी पुरेसे पाणी द्या ; मगच कोरडा दिवस पाळा !  ​​

एकही कारवाई नाही 

क्‍यूआर कोड स्टिकर्स लावण्याच्या कामाला साधारण वर्ष उलटूनही गती येऊ शकली नाही. नियम आहे म्हणून केवळ फिटनेसला येणाऱ्या वाहनांनाच क्‍यूआर कोड बसवण्यात येतात. आरटीओ किंवा पोलिसांनी क्‍यूआर कोड नाही म्हणून एकही कारवाई केलेली नाही. 

क्‍युआर कोड ही संकल्पना प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत स्त्युत आहे. मात्र याला व्यापक स्वरुप येण्यासाठी आरटीओ आणि पोलिसांनी संयुक्त माहिमा घेऊन शंभर टक्के रिक्षांना क्‍युआर कोड लावण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. 
निसार अहेमद (अध्यक्ष रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समिती) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Auto Rikshwa QR cod