आधी पुरेसे पाणी द्या; मगच कोरडा दिवस पाळा!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

  • औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ताशेरे
  • होत नाही नियमित होणारी औषध तसेच धूरफवारणी 
  • 115 वॉर्डांचा सूक्ष्म आराखडा तयार करण्याचे आदेश
     

औरंगाबाद - डेंगी आटोक्‍यात आणण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे; तरीही यश येत नाही. मंगळवारी (ता. 19) सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी आरोग्य विभागावर ताशेरे ओढले. यापूर्वी नियमित होणारी औषध तसेच धूरफवारणी होत नाही, डेंगीचा रुग्ण आढळल्यानंतरच उपाययोजना राबविल्या जातात. साथ येण्यापूर्वी उपाययोजना करण्याऐवजी डेंगीचे रुग्ण सापडण्याची वाट पाहता का, असा सवाल केला. आधी पुरेसे पाणी द्या मग कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करा असेही सुनावले.

यानंतर महापौरांनी शहरात डेंगी नियंत्रणासाठी सर्वसमावेशक उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.  दोन महिन्यांपासून शहरात डेंगीचे थैमान सुरू आहे. आतापर्यंत डेंगीच्या 11 संशयितांचा मृत्यू झाला. यामुळे नगरसेवक सभागृहात आक्रमक झाले. डेंगी निर्मूलनाचा महापालिकेचा
ऍक्‍शन प्लान केवळ कागदावरच असल्याचा नगरसेवकांनी आरोप केला. नगरसेवकांनी डेंगीविषयी विविध प्रश्न उपस्थित करत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांना धारेवर धरले.

हेही वाचा -  येमेनची कन्या झाली औरंगाबादची सून..

डेंगीची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या भागात आरोग्य विभागाकडून उपाययोजना राबविल्या जातात, हा असा ऍक्‍शन प्लान डेंगीवर नियंत्रण कसे मिळवणार असा सवाल करण्यात आला. स्पष्टीकरण देताना मलेरिया विभागप्रमुख डॉ. अर्चना राणे यांनी वातावरण बदल आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे सांगितले. त्यावर नगरसेवकांनी डेंगीच्या नियंत्रणासाठी धूरफवारणी, औषध फवारणी, ऍबेटिंग, कोरडा दिवस पाळणे; तसेच जनजागृती यावर सर्व वॉर्डात सर्वसमावेशक उपाययोजना राबविण्याची मागणी केली. त्यावर महापौर घोडेले यांनी 115 वॉर्डांचा सूक्ष्म आराखडा तयार करून प्रत्येक वॉर्डांत उपाययोजना राबविण्याचे आदेश प्रशासनाला दिले. 

हेही वाचा - बाळासाहेबांचा फोटो शोधताना शिवसेना भवनातील चोरी उघड
 
अनेक भागांत आठव्या दिवशी पाणी 
शहरात सातव्या-आठव्या दिवशी पाणी येते. यामुळे ते साठवून ठेवावे लागते. स्वच्छ पाण्यात लारवा होतात हे मान्य; मात्र आधी नियमित पाणीपुरवठा झाला तर लोक कशाला पाणी साठवून ठेवतील? आधी नियमित पाणीपुरवठा करा मग कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करा. तर डेंगीची परिस्थिती नियंत्रणात येईल, असे मत माधुरी अदवंत यांनी व्यक्‍त केले.

त्यावर काही मोजकेच वॉर्ड वगळता शहरात सर्वत्र सहाव्या ते सातव्या दिवशी पाणीपुरवठा होत असल्याबद्दल सर्वच नगरेवकांनी संताप व्यक्त केला. त्यावर महापौरांनी कोणत्या वॉर्डांत कितव्या दिवशी पाणी दिले जाते, याचा सविस्तर अहवाल आगामी दोन दिवसांत सादर करण्याचे पाणीपुरवठा विभागाला आदेशित केले. तसेच सर्वत्र चार दिवसांआड पाणी देण्याची सूचना केली. 

हेही वाचा उस्मानाबादसह चार तालुके गुढ आवाजाने हादरले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dengue spread in Aurangabad