'बर्ड फ्ल्यूची सध्यातरी भिती नको, अर्धा तास शिजवून खा अंडी, चिकन'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 January 2021

अफवा पसरवू नका, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. हिमायतबागेत सापडलेल्या मृत किंगफिशर पक्षाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत

औरंगाबाद: बर्ड फ्ल्यू (bird flu) मराठवाड्यात आला आहे, मात्र अद्यापतरी औरंगाबाद जिल्ह्यात कोठेही कोणत्याही प्रकारच्या पक्षाचा अनैसर्गिक मृत्यू झालेला नाही. कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. अंडी , चिकन अर्धातास शिजवल्यानंतर कोणताही विषाणू त्यात राहत नाही यामुळे अंडी, चिकन चांगले शिजवुन खा. बर्ड फ्ल्यूची सध्यातरी भिती बाळगू नये असा दिलासा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिला आहे.

बर्ड फ्ल्यूचा संसर्ग मराठवाड्यात झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. चव्हाण बुधवारी (ता.१३) घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रशांत चौधरी, जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने, महापालिकेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी. एस. नाईकवाडे उपस्थित होते.

औरंगाबाद जिल्ह्यात बर्ड फ्लू? पिशोरमधील अनेक कोंबड्या अचानक दगावल्या

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले, जिल्ह्यात कोणत्याही गावात कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत पक्षामध्ये अनैसर्गिक मरतुक झाल्याचे आढळले नाही. जिल्हातील जायकवाडी,नांदुर मधमेश्‍वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्षी येत असतात मात्र या दोन मोठ्या धरणांसहर अन्य कोणत्याही पाणवठ्यावरही वन्यपक्षी किंवा स्थलांतरीत पक्षी मृत झालेला नाही.

प्रत्येक तालूक्यात रॅपिड रिस्पॉन्स टीम-
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. डी. चौधरी यांनी सांगीतले, जिल्ह्यात ५ हजारांपेक्षा जास्त कोंबड्या असलेल्या पोल्ट्री फार्मची संख्या १३१ तर यापेक्षा कमी संख्या असलेल्या आणि शेतील जोडधंदा म्हणुन करण्यात येत असलेल्या फार्मची संख्या २२२ इतकी आहे. याशिवाय परसात करण्यात येत असलेल्या घरगुती कुक्कूटपालनाचे सर्वेक्षण सुरू आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पशुसंवर्धन अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पुर्ण झाले आहे. प्रत्येक तालूक्यात रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार करण्यात आल्या आहेत. याशिवाय खडकेश्‍वर येथे चार डॉक्टरांचे पथक कायम सज्ज आहे. बर्ड फ्ल्यू कोंबड्यातुन माणसात संक्रमीत होण्याची घटना गेल्या वीस वर्षात संबंध भारतात कधी झालेली नाही. केवळ हा व्हायरल डिसीज असल्यामुळे भिती नको काळजी घेणे अतीशय गरजेचे आहे.

मकरसंक्रांतीनिमित्त महिलांची आठवडी बाजारात खरेदीसाठी गर्दी

काय कराल-

  • पक्षांच्या स्त्रावासोबत तसेच विष्ठेशी संपर्क टाळावे.
  • कोंबड्यांचे खुराडे, पिंजरे, अन्नपाणी दिले जाणारे भांडे रोज डिटर्जंट पावडरने धुवुन स्वच्छ ठेवावे.
  • एखादा पक्षी मेला तर त्याला स्पर्श करू नये. शवविच्छेदन करू नये किंवा त्याची परस्पर विल्हेवाट लावु नये. त्याऐवजी जिल्हा तसेच विभागीय नियंत्रण कक्षाला जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखाण्यात कळवावे किंवा १८००२३३०४१८ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी
  • पोल्ट्रीतील पक्षांसोबत काम करताना वारंवार साबनाने हात धुवा, व्यक्तिगत स्वच्छता राखण्याबरोबरच परिसरही स्वच्छ ठेवा.
  • कच्चे चिकन किंवा चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क, हातमोजांचा वापर करा, पुर्णपणे शिजवलेलेच चिकन, अंडी खा.
  • परिसरात जलाशय, तलाव असतील आणि तिथे पक्षी येत असतील तर वनविभाग किंवा पशुसंवर्धन विभागाला माहिती कळवावी.

अखेर औरंगाबादेत कोरोनाची लस दाखल, १६ जानेवारीपासून लसीकरणाला होणार सुरुवात

मेलेल्या किंगफिशरचे नमुने प्रयोगशाळेकडे-
श्री. चौधरी यांनी सांगीतले, बुधवारी (ता.१३) हिमायत बागेत किंगफिशर हा पक्षी मृत आढळला आहे, मात्र त्यात बर्ड फ्ल्यूसदृश्‍य लक्षणे नाहीत. तथापि त्याची तपासणी करण्यासाठी पुण्याच्या प्रयोगशाळेकडे नमुने पाठवण्यात येणार आहेत. यानंतर भोपाळ येथील प्रयोगशाळेकडे मृत किंगफिशर तपासणी करण्यसाठी पाठवण्यात येणार आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad breaking news bird flu information by sunil chavan