VIDEO : यासाठी झाला जय गजाननाचा औरंगाबादेत गजर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 डिसेंबर 2019

एकाच दिवशी आणि एकाच वेळी तब्बल 13 ठिकाणी दोन हजारावर भक्‍तांनी मंगलमय वातावरणात श्री. गजानन विजय ग्रंथाचे महापारायण केले 

औरंगाबाद -  श्री गजानन महाराज (शेगाव) मंदिर, विश्वस्त मंडळ औरंगाबादतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा अर्थात श्रद्धाभूमी ते प्रकटभूमी या औरंगाबाद ते शेगाव पायी दिंडी दशकपूर्तीनिमित्त रविवारी (ता. 15) श्री गजानन विजय ग्रंथ महापारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. एकाच वेळी शहराच्या वेगवेगळ्या भागांत आयोजित या सोहळ्यात 2,400 भक्‍तांनी श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण केले. 

गेल्या दहा वर्षांपासून श्रद्धाभूमी ते प्रकटभूमी पायी दिंडीचे आयोजन केले जाते. यंदाचे दिंडीचे 11 वे वर्ष आहे. यानिमित्त शहरातील वेगवेगळ्या भागांत महापारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. भक्‍ती गणेश मंदिर, किलबिल शाळा, जयभवानीनगर जिजामाता कॉलनीतील सिडको गार्डन, कुलस्वामिनी मंगल कार्यालय, ज्युदो असोसिएशन हॉल, सप्तपदी मंगल कार्यालय, श्री गजानन महाराज भवन गारखेडा, वाणी मंगल कार्यालय शिवाजीनगर, वरद गणेश मंदिर समर्थनगर, श्री जागृत हनुमान मंदिर वाळूज, श्री शक्तिधाम मंदिर मिटमिटा, मधुमालती सभागृह कांचननगर आणि क्षत्रिय कुमावत मंगल कार्यालय पदमपुरा या ठिकाणी हजारो गजाननभक्‍त पारायणासाठी बसले होते.

 क्‍लिक करा : माझ्या पप्पाचा पगार वाढवा ना, चिमुकलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

 सकाळी सात वाजता सद्‌गुरू श्री गजानन महाराज यांचे पूजन करून महापारायणाला सुरवात झाली. महापारायण सोहळ्याच्या ठिकाणचा परिसर रांगोळ्या काढून सजविण्यात आला होता. महिला, पुरुष आणि युवा भक्‍त या पारायण सोहळ्यात सहभागी झाले होते. 

दिंडीचे शेगावकडे शनिवारी प्रस्थान 

पारायणानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. श्री गजानन महाराज मंदिर विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण वक्‍ते म्हणाले, ""दिंडीचे यंदाचे 11 वे वर्ष असून, शनिवारी (ता. 21) दिंडीचे शेगावकडे प्रस्थान होणार आहे. तत्पूर्वी गारखेडा येथील श्री. गजानन महाराज मंदिरापासून सकाळी सात वाजता मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत शहरवासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,'' असे आवाहन त्यांनी केले. 

हेही वाचा : video : अरेच्चा ! कोंबडीशिवाय जन्मतात पिले ! 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad Gajanan maharaj palkhi