पवार-मोदी भेटीत लिहली, या बंडाची स्क्रीप्ट- इम्तियाज जलील 

शेखलाल शेख
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

  • राज्यपाल पद हे आता राजकीय झाले
  • भाजपकडून सर्व अस्त्रांचा वापर
  • आमचा कुणाला पाठींबा नाही

औरंगाबादः राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड पुकारात भाजपला पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय हा काका शरद पवारांच्या सल्याशिवाय घेऊच शकत नाही असा खळबळजनक आरोप एमआयएमचे खासदार तथा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत शरद पवार यांनी भेट घेतली तेव्हाच या बंड नाट्याची स्क्रीप्ट लिहली गेली होती असा दावा देखील इम्तियाज यांनी केला. 

सत्तास्थापनेच्या " रात्रीस खेळ चाले' वर एमआयएमने आपली तिखट प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी अजित पवारांचे बंड हे शरद पवार यांच्या सल्यानेच केल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजप कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रासारखे राज्य आपल्या हातून जाऊ देणार नाही, आणि लवकरच या-ना त्या मार्गाने सत्ता मिळवेल हे मी अकरा तारखेलाच माझ्या मुलाखतीत सांगितले होते. आज ते खरे होतांना दिसत आहे असेही ते म्हणाले.

हेही वाचा : अजित पवारांनी पद बदलले, पण पक्ष तोच ठेवला

भाजपची बी टीम अशी टिका करणाऱ्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीला आता आमच्यावर टिका करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही असा टोलाही इम्तियाज यांनी लगावला. एमआयएमने राज्याच्या सत्तेत कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही हा निर्णय फार आधीच जाहीर केला होता. आम्ही त्यावर ठाम आहोत. आम्हाला फोडण्याचा, पाठिंबा देण्यासाठी गळ घालण्याचे अनेक प्रयत्न सगळ्याच राजकीय पक्षांनी केले. प्रसंगी दबावही आणला, पण आम्ही ठाम आहोत, कुणालाही पाठिंबा देणार नाही याचा पुनरुच्चार देखील इम्तियाज जलील यांनी केला आहे. 

भाजपकडून सर्व अस्त्रांचा वापर 

केंद्रातील भाजप सरकारचे धोरण हे साम, दाम, दंड भेद या अस्त्रांचा वापर करत सत्ता मिळवणे असेच राहिले आहे. अनेक राज्यात ते दिसून आले, तोच प्रयोग त्यांनी महाराष्ट्रात देखील केला आहे. राज्य सहकारी बॅंक घोटाळा प्रकरणी ईडीने शरद पवारांचे नाव घेतल्यापासून या प्रयोगाला सुरुवात झाली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवारांना जेलची हवा खायला पाठवू म्हणणारे देवेंद्र फडणवीस आज त्यांच्याच पाठिंब्यावर मुख्यमंत्री होऊन राज्यात सत्ता स्थापन करू पाहत आहेत.

संबंधित बातमी - उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत साधला संवाद

राजकीय मतभेद, नितीमत्ता याला राजकारणात कुठलेही स्थान नसते हे अजित पवारांनी भाजपला पाठिंबा देऊन तर सत्तेसाठी शिवसेना-राष्ट्रवादी व कॉंग्रेस या तीन वेगळ्या विचारधारा असलेल्या पक्षांनी एकत्र येऊन दाखवून दिले आहे असा टोला देखील इम्तियाज जलील यांनी लगावला. 

बाळासाहेबांनी कमावले ते मुलाने गमावले... 

बाळासाहेब ठाकरे यांचे राजकारण आणि दरारा मी पत्रकार आणि राजकारणी म्हणून पाहिलेला आहे. ज्या बाळासाहेबांनी राष्ट्र आणि राज्यपातळीवरच्या नेत्यांना आपल्या मातोश्रीवर पायधुळ झाडायला भाग पाडले, त्या बाळासाहेबांचे पुत्र आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना मात्र तो दरारा कायम राखता आला नाही. सत्तेसाठी त्यांना शरद पवार, कॉंग्रेसच्या नेत्यांच्या मागेपुढे फिरावे लागत असल्याची टिका देखील इम्तियाज जलील यांनी केली.

हेही वाचा : अजित पवारांनी कापले परतीचे दोर, पंतप्रधानांना दिला शब्द

राज्यपाल पद हे आता राजकीय झाले 

राज्यपाल पद हे आता राजकीय झाले आहे, त्यांना स्वःता निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत, सत्ताधारी पक्षाकडून राज्यपालांची नेमणूक होत असल्याने ते त्यांच्या हातचे बाहुले बनले आहेत. त्यामुळे हे पदच रद्द केले पाहिजे आणि एखाद्या माजी न्यायमुर्तींची नेमणूक त्यांच्या जागी केली पाहिजे. रात्री बे रात्री राजभवनातून सुत्रे हलवली जातात, राष्ट्रपती राजवट हटवून सकाळी गुपचुपत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली जाते, हे महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदा घडत आहे. केंद्राच्या दबावात राज्यपाल काम करतात हे यावरून स्पष्ट होते असेही इम्तियाज म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad imtiaz jalil Ajit pawar Rebellion