घाटी परिसरातच उभारली जाणार एमसीएच विंग 

योेगेश पायघन
रविवार, 22 डिसेंबर 2019

माता आणि नवजात शिशूंची होणारी ताटातूट होऊ नये म्हणून घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर या स्वतंत्र एमसीएच विंगसाठी आग्रही आहेत. घाटीत दरवर्षी 18 हजार प्रसूती होतात. त्या तुलनेत असलेल्या पायाभूत सुविधा कमी पडतात. त्यासाठी तीनशे खाटांच्या 78 कोटींच्या जीप्लस फाइव्ह बिल्डिंगचा प्रस्ताव त्यांनी सादर केला होता.

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) परिसरात राष्ट्रीय आरोग्य अभियानातून 200 बेडची स्वतंत्र माता व बालसंगोपन (एमसीएच) विंगची उभारणी केली जाणार आहे. त्यासंबंधी शुक्रवारी (ता.20) उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांची भेट घेत यावर विस्तृत चर्चा केली. त्यानंतर एमसीएच विंग ही घाटीतच तर दूध डेअरीच्या जागेवर 200 बेडचे महिला व बालरुग्णालय होईल, असे उपसंचालक डॉ. लाळे यांनी स्पष्ट केले.

घाटीत माता आणि नवजात शिशूंची होणारी ताटातूट होऊ नये म्हणून घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर या स्वतंत्र एमसीएच विंगसाठी आग्रही आहेत. घाटीत दरवर्षी 18 हजार प्रसूती होतात. त्या तुलनेत असलेल्या पायाभूत सुविधा कमी पडतात. त्यासाठी तीनशे खाटांच्या 78 कोटींच्या जीप्लस फाइव्ह बिल्डिंगचा प्रस्ताव त्यांनी सादर केला होता.

हेही महत्वाचेऔरंगाबादेत शांततेचे वातावरण 

केंद्र शासनाकडून 200 बेडची स्वतंत्र एमसीएच विंगला चार जुलै 2018 ला मान्यता मिळाली. त्यासाठी 38 कोटींचा निधी मंजूर तर 2018-19 या आर्थिक वर्षासाठी पाच कोटींचा निधीही मंजूर झाला. हा विभाग दूधडेअरीच्या जागेत की घाटीत, अशा गोंधळात अडकला होता. आता घाटीत एमसीएच विंग उभारणीवर शिक्कामोर्तब झाले आहे. 

हेही वाचा - माता मृत्युदर रोखण्यासाठी कृती आराखडा 

पदमान्यतेवर अडली गाडी 
एमसीएच विंगला सुरवातीला कोणत्याही अतिरिक्त पदांची मागणी नव्हती. त्यानंतर घाटीने अपुऱ्या मनुष्यबळाच्या पार्श्‍वभूमीवर स्वतंत्र इमारतीची गरज म्हणून वर्ग-3 ची 26 तर वर्ग चारची 130 पदे अशी 156 पदे मागितली आहेत. तर वर्ग एक व वर्ग दोनच्या पदांची पूर्तता आहे त्या मनुष्यबळात होणार आहे. मागितलेली पदे कंत्राटी स्वरूपाची आहेत. त्यासाठी प्रशासकीय मान्यता अडवल्याने जागा, पैसा आणि गरज असताना एमसीएच विंगचा प्रकल्प रेंगाळला आहे. 

एमसीएच विंग घाटीतच होण्यासाठी आग्रह आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे यांच्याशीही यासंबंधी चर्चा झाली. या विंगमुळे अद्ययावत लेबररूम, चांगले वॉर्ड प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना मिळतील. शिवाय नवजात शिशूंची ताटातूटही थांबेल. एमसीएच विंगच्या प्रशासकीय मान्यतेसाठी पाठपुरावा सुरू आहे. 
-डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी  

 हेही वाचा : पिसादेवीकरांना महिनाभरात जायकवाडीचे पाणी   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad MCH wing to be set up in ghati hospital area​