कुणी न्यायालयात गेले, तर महापौरच तुरुंगात जातील!

माधव इतबारे
शनिवार, 14 डिसेंबर 2019

बैठकीत दानवे यांनी शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांना घरचा आहेर दिल्याने अधिकारीही अचंबित झाले. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. कंत्राटदारांचे सुमारे अडीचशे कोटी रुपयांची देणी आहे. हे पैसे देण्यासाठी शासनाकडून विशेष मदत मिळावी, अशी मागणी महापौर घोडेले यांनी करताच आमदार दानवे यांचा पारा चढला.

औरंगाबाद- राज्यात कुठेही जा, महापालिकेचे बजेट मार्च महिन्यात अंतिम होते आणि तुमच्या बजेटसाठी डिसेंबर महिना उजाडला आहे. बजेट तयार करताना उत्पन्नाच्या दीडपट अपेक्षित खर्च समजू शकतो. मात्र, अवाच्या सव्वा बजेट नागरिकांना खूश करण्यासाठी फुगवून ठेवता. कोणी न्यायालयात गेले तर तुम्ही तुरुंगात जाल, असा इशारा शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी शिवसेनेचेच महापौर नंदकुमार घोडेले यांना शनिवारी (ता.14) दिला. 

विधान परिषद सदस्य अंबादास दानवे यांनी शनिवारी महापालिकेच्या शासन दरबारी असलेल्या प्रलंबित मागण्यांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत दानवे यांनी शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांना घरचा आहेर दिल्याने अधिकारीही अचंबित झाले. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. कंत्राटदारांचे सुमारे अडीचशे कोटी रुपयांची देणी आहे. हे पैसे देण्यासाठी शासनाकडून विशेष मदत मिळावी, अशी मागणी महापौर घोडेले यांनी करताच आमदार दानवे यांचा पारा चढला. कंत्राटदारांची बिले देण्यासाठी शासनाकडून पैसे कसे मिळतील? तुमचे काम शिस्तीने चालत नाही, हे आधी लक्षात घ्या, असे सांगत त्यांनी बजेटच्या विलंबावर बोट ठेवले. महापालिकेचे बजेट मार्च महिन्यातच अंतिम झाले पाहिजे.

आणखी वाचा - 'देश वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागेल'

राज्यात कुठेही जा, आपल्यापेक्षा मोठ्या महापालिकांचे बजेट देखील वेळेत होते. मात्र तुम्हाला डिसेंबर उजाडला आहे. बजेट किती फुगवणार? स्थायी समिती चारशे कोटींची भर टाकते, महापौर तीनशे कोटींची कामे वाढवितात. हे किती दिवस चालणार? जनतेला खूश करण्यासाठी तुम्ही कामे वाढविता; मात्र कामे झाली नाही तर जनता नाराज होते हे तुम्ही लक्षात घ्या, अंथरूण पाहून पाय पसरा, अशा शब्दांत दानवे यांनी महापौरांसह पदाधिकाऱ्यांना घरचा आहेर दिला. बरे आहे, कोणी न्यायालयात जात नाही. नाही तर तुम्ही तुरुंगातच जाल, असा इशाराही दानवे यांनी महापौरांना दिला. 

बिले काढून देण्याचा धंदा झालाय 
महापालिकेत आर्थिक शिस्त राहिलेली नाही. बिले ज्येष्ठता यादीनुसारच वाटप झाली पाहिजेत. एखाद्या कंत्राटदाराचे मोठे बिल असेल तर त्याला कमी रक्कम देऊन इतरांची देखील बिले काढली पाहिजे. इथे बिले काढून देण्याचा अक्षरशः धंदा झाला आहे. त्यामुळे तुम्ही लक्ष घाला, अशी गळही दानवे यांनी आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांना घातली. 

आणखी वाचा - 'माफी मागायला माझं नावा राहुल सावरकर नाही'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal Budget News