Video : महापालिका आयुक्तांच्या रिकाम्या खुर्चीला घातला हार!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

दिवाळीच्या सुटीवर गेलेले महापालिका आयुक्‍त अजूनही आलेले नाहीत. शहराची कामे ठप्प, कार्यक्षम आयुक्‍त देण्याची भाजपची मागणी.

औरंगाबाद : दिवाळीच्या सुटीवर गेलेले महापालिका आयुक्‍त अजूनही आलेले नाहीत. सर्वसाधारण सभेत मंगळवारी (ता. १९) ते सभागृहात हजर न राहिल्याने त्यांच्या रिकाम्या खुर्चीला भाजपच्या सदस्यांनी हार घालून निषेध व्यक्‍त केला. 

''महापालिका आयुक्‍त निपुण विनायक हे सतत रजेवर जात असल्याने त्यांना इथे काम करण्यात रस वाटत नाही. परिणामी महापालिकेचे प्रशासन पूर्णपणे ढेपाळले असून शहराची विकास कामे ठप्प आहेत. त्यामुळे आयुक्‍तांना परत शासनाकडे पाठवून द्यावे आणि राज्यपालांकडे कार्यक्षम आयुक्‍त शहराला देण्याची मागणी करावी अशा भावना नगरसेवकांतून व्यक्‍त केल्या. यासंदर्भात विभागीय आयुक्‍तांची सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेट घेऊन राज्यपालांकडे ही मागणी करण्यात येईल,'' असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी जाहीर केले.

औरंगाबादेत - जागतिक धम्म परिषदेची तयारी जोरात

दिवाळीच्या सुट्यांच्या निमित्ताने आयुक्‍त रजेवर गेले आहेत, त्यांचा अतिरिक्‍त कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला होता, मात्र त्यांच्याकडे 10 तारखेपर्यंतच कार्यभार देण्यात आला होता. त्यामुळे या सभेसाठी जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी येवू शकले नाहीत. परिणामी मंगळवारी (ता.19) झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाचा प्रमुख म्हणून महापालिका आयुक्‍तांनी हजर राहणे अपेक्षित होते. किमान त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी तरी असायला पाहीजे होता.

जाणून घ्या - बँकवाले आज काय करणार शेती, पीक कर्जावर चर्चा 

मात्र, दोन्हीपैकी काहीही न झाल्याने पीठासन अधिकाऱ्यांच्या बाजूची आयुक्‍तांची खुर्ची रिकामीच होती. यामुळे सभेला सुरुवात झाल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी सोबत आणलेला हार आयुक्‍तांच्या रिकाम्या खुर्चीला घालून निषेध व्यक्‍त केला. आयुक्‍तांच्या अनुपस्थितीविषयी नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली तसेच शहरात डेंगी, कचऱ्याचा प्रश्‍न, पाण्याचा प्रश्‍न, मालमत्ता कराची घटलेली वसुली असे अनेक प्रश्‍न असताना आयुक्‍तांना गांभीर्य नसल्याचे आरोप नगरसेवकांनी करत या आयुक्‍तांना शासनाकडे परत पाठवून कार्यक्षम आयुक्‍तांची मागणी करावी, यासाठी विभागीय आयुक्‍तांची भेट घ्यावी अशा सूचना केल्या.

चर्चेनंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी, शहरातील कामे ठप्प झाल्याचे मत व्यक्‍त करुन नगरसेवकांना लोक प्रश्‍न विचारुन भंडावून सोडत आहेत. शहरात भयाण परिस्थिती झाल्याची त्यांनी कबुली देत यासंदर्भात विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांची सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या माध्यमातुन भेट घेतली जाईल. शहरात उद्‌भवलेली परिस्थिती विभागीय आयुक्‍तांना सांगून विद्यमान आयुक्‍त निपुण विनायक यांना शासनाकडे परत पाठवुन त्यांच्यामार्फत राज्यपालांकडे कार्यक्षम आयुक्‍त देण्याची मागणी केली जाईल, असे सभागृहात स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal Corporation Commissioner on Leave