Video : शेवटी औरंगाबाद पोलिसांनीच ठोकल्या आंतरराज्य टोळीला बेड्या

मनोज साखरे
Monday, 9 December 2019

ऑईल गळती झाली, टायर पंक्‍चर झाले, अशा थापांसह नजर चुकवून पैशांची लूट केली जात होती. यानंतर लुटारू पळून जात होते. या घटनांचा तपास पोलिसांकडून सुरु होता. पण बॅग लिफ्टर सापडत नव्हते.

औरंगाबाद : बॅंकेत जायचे. पैसे काढणारांवर लक्ष ठेवायचे. मोठी रक्कम काढून जाणाऱ्यांचा पाठलाग करायचा. नजर चुकवून चकमा देत रोकड लांबवायची, तर काही प्रसंगी रोकड हिसकावूनही न्यायची. अशी मोडस वापरुन आंध्रप्रदेश, तामिळनाडूतील कुख्यात टोळी लोकांना लुटत होती. या टोळीच्या पैठणमधून रविवारी (ता. आठ) गुन्हेशाखा पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या. दीड ते दोन वर्षांपासून शहर व जिल्ह्यात ही टोळी ठाण मांडून होती. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, प्रकाश नारायण मेकला (वय 31), राजू नारायण कोलंम (वय27), राजू यादगिरी बोनाला (वय 35), जोसेफ नारायण मेकला (वय 33), अशोक नारायण कोत्तम (वय 23, सर्व रा. चेन्नई, तामिळनाडू) व सुरेश अंजया बोनालू (वय 27, विजयवाडा, आंध्रप्रदेश) अशी अटकेतील आंतरराज्य बॅग लिफ्टर्सची नावे आहेत. 

का झाला जळगाव रस्त्याच्या कामावर खून?

  • तामिळनाडू, आंध्रची गॅंग 
  • दोन वर्षांपासून होती दहशत 
  • पैठणमधून आवळल्या मुसक्‍या 
  • बीड, सातारा, सोलापुरातही होते सक्रीय 

औरंगाबाद शहर व जिल्ह्यात अनेक महिन्यांपासून बॅंकेतून रक्कम नेणाऱ्या नागरिकांना लक्ष्य केले जात होते. ऑईल गळती झाली, टायर पंक्‍चर झाले अशा थापांसह नजर चुकवून पैशांची लूट केली जात होती. यानंतर लुटारू पळून जात होते. या घटनांचा तपास पोलिसांकडून सुरु होता. पण बॅग लिफ्टर सापडत नव्हते. काही ठिकाणच्या सीसीटीव्हीचा आधार घेतल्यानंतर टोळी स्थानिक नसल्याचे लक्षात येत होते. यावर वर्कआऊट केल्यानंतर अशी गुन्हे करणारी टोळी पैठणमध्ये असल्याची माहिती गुन्हेशाखेला समजली.

बायकोला चांगले वागवीन म्हणाला म्हणून...

  • टोळीतील पाच सदस्य चेन्नई व एक विजयवाडातील. 
  • सहाजण पैठण येथे दोन स्वतंत्र घरात किरायाने राहत होते. 
  • टोळीने शहर व जिल्ह्यात अनेक गुन्हे केल्याची शक्‍यता. 
  • शहरात सहा ठिकाणी बॅग लिफ्टिंग.. 

पथकाने पैठण येथे नारळ भागात सापळा रचला व तेथील एका घरातून प्रकाश मेकला, राजू कोलंम, व राजु बोनाला यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून इतर साथीदारांची नावे कळाली. त्यानंतर शहरातील दुसऱ्या भागात छापा टाकून टोळीतील सुरेश बोनालु, जोसेफ मेकला, अशोक कोत्तम यांच्या मुसक्‍या आवळल्या. या सहाही जणांना अटक करण्यात आली. तसेच मुद्देमालही जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, राजेंद्र साळुंखे, शिवाजी झिने, नितीन देशमुख यांनी केली. 

येथे मारला डल्ला 

टोळीने शहरीतील सिडको, जिन्सी, जवाहरनगर, एमआयडीसी वाळूज पोलिस ठाणे हद्दीत नागरिकांवर पाळत ठेऊन रकमांची बॅग लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Police Arrested Bag Lifters Gang from Paithan