Sambhaji Nagar News : याचिकाकर्त्याला खंडपीठाकडून लाखाचा दंड ; प्रशासकांच्या बदलीची केली होती मागणी

मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्यावर आरोप करीत त्यांच्या बदलीची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या येथील खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे, न्या. आर. एम. जोशी यांनी एक लाखांचा दंड ठोठावला.
Sambhaji Nagar News
Sambhaji Nagar Newssakal

छत्रपती संभाजीनगर : मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्यावर आरोप करीत त्यांच्या बदलीची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या येथील खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे, न्या. आर. एम. जोशी यांनी एक लाखांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम ठरवून दिलेल्या विविध संस्थांना देण्याचे आदेशही खंडपीठाने दिले आहे.

माजी नगरसेवक नासेर नाहदी मोहम्मद याह्यादी यांनी ॲड. टी. वाय. सय्यद यांच्यामार्फत याचिका दाखल केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांची बदली करण्याची मागणी याचिकेत केली होती. निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार जो अधिकारी निवडणुकीशी संबंधित असेल किंवा त्याला एकाच ठिकाणी तीन वर्षे झाली असेल तर त्याची बदली करण्याचे निर्देश आहेत.

मात्र, जी. श्रीकांत यांनी बदली होऊ नये यासाठी वरिष्ठांना २ कोटी रुपये दिल्याचा आरोप याचिकेत केला होता. तसेच राजकीय व्यक्तींसोबत त्यांचे संबंध असल्याचा आरोपही याचिकाकर्त्यांने केला होता. सुनावणीवेळी खंडपीठाने २ कोटी रुपये दिल्याबद्दलचे पुरावे आहेत का, अशी विचारणा केली, त्यावेळी याचिकाकर्त्याला पुरावे सादर करता आले नाहीत.

Sambhaji Nagar News
School Inspection : सहशिक्षकाचे सीईओंकडून निलंबन ; पाबळतांडा शाळेची गुणवत्ता असमाधानकारक

त्यामुळे खंडपीठाने याचिककर्त्यास दंड लावण्याचा इशारा देत ही याचिका मागे घेण्यासाठी मुभाही दिली होती. तरीही याचिकाकर्त्याने याचिका मागे घेतली नाही. त्यामुळे खंडपीठाने त्याला एक लाख रुपयांचा दंड लावला. मनपातर्फे ॲड. संजीव देशपांडे, ॲड. सुहास उरगुंडे तर शासनातर्फे ॲड. अमजीतसिंह गिरासे यांनी काम पाहिले.

अशी केली विभागणी

दंडाची रक्कम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास (घाटी रुग्णालय) २५ हजार, कर्करोग रुग्णालय २५ हजार, बीड येथील आनंदवन संस्थेस १५ हजार, शिरूर कासार येथील शांतीवन संस्थेस १५ हजार, मुंबई उच्च न्यायालयातील डे केअर सेंटरला १० हजार आणि उच्च न्यायालय असोसिएशनला १० हजार रुपये देण्याचे आदेश देत याचिका खारीज केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com