esakal | मुंबईच्या धर्तीवर औरंगाबाद विकास प्राधिकरण : मुख्यमंत्र्यांची घोषणा 
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad City news

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी गुरुवारी महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात हत्माम्यांना आदरांजली वाहत पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमात सहभाग घेत जनतेला शुभेच्छा दिल्या.

मुंबईच्या धर्तीवर औरंगाबाद विकास प्राधिकरण : मुख्यमंत्र्यांची घोषणा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद ः मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. मुंबईच्या धर्तीवर विकास प्राधिकरण झाले पाहिजे, यासाठी औरंगाबाद विकास प्राधिकरणाचा विचार व्हावा. विकासच्या पोकळ गप्पा न होता तो प्रत्यक्षात दिसला पाहिजे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. १७) व्यक्त केले. यंदा चांगला पाऊस झाला असला तरी मराठवाडा दुष्काळग्रस्त राहू नये, याची जबाबदारी सरकारने घेतली असल्याचे श्री. ठाकरे यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी गुरुवारी महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात हत्माम्यांना आदरांजली वाहत पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमात सहभाग घेत जनतेला शुभेच्छा दिल्या. पुढे ते म्हणाले, १७ सप्टेंबर हा मराठवाड्याचा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यदिन आहे. मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त करण्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली. मराठवाडा जशी संताची भूमी आहे, तशी अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्यांची देखील आहे. स्वातंत्र्यसेनानींमुळे आपल्याला स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे भाग्य मिळते. मराठवाड्याने अनेक चांगले मुख्यमंत्री, मंत्री दिले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

यंदा चांगला पाऊस झाला असला तरी भविष्यात मराठवाडा दुष्काळग्रस्त होऊ नये, याची जबाबदारी शासनाने घेतली आहे. समृद्धी महामार्गामुळे औरंगाबाद शहरासह परिसराचा विकास होणार आहे. असे असले तरी विकासाच्या पोकळ गप्पा न होता, तो प्रत्यक्षात दिसला पाहिजे, अशी माझी भूमिका असून, मुंबईच्या धर्तीवर औरंगाबाद विकास प्राधिकरण झाले पाहिजे, यासाठी विचार झाला पाहिजे. पालकमंत्र्यांनी त्यानुसार काम करावे, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे औरंगाबाद शहरावर प्रेम होते. त्यामुळे मी कार्यक्रमाला येऊ शकलो नसलो तरी भाविनकदृष्ट्या तुमच्या सोबतच आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास नव्या पिढीला माहीत व्हावा, यासाठी सिद्धार्थ उद्यानात मुक्ती संग्राम संग्रहालय उभारण्यात आले असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा 

यावेळी मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांच्यासह संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे, सतीश चव्हाण, हरिभाऊ बागडे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार कल्याण, काळे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

आता युद्ध कोरोनाशी 
एकीकडे आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत, मात्र दुसरीकडे आपल्या तोंडावर मास्क आहे. आता लढा आपल्याला कोरोनातून मुक्त होण्यासाठी द्यावा लागणार आहे. त्यासाठी मराठवाडा कोरोनामुक्त करू, अशी शपथ प्रत्येकाने घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.