esakal | कोरोनामुळे वर्षभरापासून बैल बाजार बंद, अर्थकारण बिघडले!

बोलून बातमी शोधा

कोरोनामुळे वर्षभरापासून बैल बाजार बंद, अर्थकारण बिघडले!
कोरोनामुळे वर्षभरापासून बैल बाजार बंद, अर्थकारण बिघडले!
sakal_logo
By
हबीबखान पठाण

पाचोड (जि.औरंगाबाद) : कोरोनामुळे गतवर्षभरापासून रविवारी पाचोड (ता.पैठण) येथे भरणारा गुरांचा आठवडे बाजार आता ऐन खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या तोंडावरही बंद असल्याने पशुपालकासह शेतकऱ्याची धांदल उडाल्याचे चित्र येथे पाहावयास मिळत आहे. वायदे बाजार पूर्ण करून पत टिकविण्यासाठी शेतकऱ्याना खासगी सावकाराचे उंबरठे झिजवण्यासोबतच जीवापाड जपलेले दावणीच्या पशुधनाचे मोबाईलवर सौदे उरकून आपल्या गरजा भागवाव्या लागत असल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळते. यंदाचा खरीप हंगाम डोक्यावर येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांना खते, बी-बियाणांची चिंता भेडसावू लागली आहे. काळया आईची ओटी भरण्यासाठी सावकाराचे उंबरठे झिजविण्यासोबतच जीवापाड जपलेले दावणीचे पशुधन बाजारात नेण्यास त्यांनी पसंती दर्शविली. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आठवडे बाजार बंद असल्याने त्यांची पंचाईत झाली. बैलांसह दुभत्या गायी, म्हशीं विकण्यासाठी व्यापाऱ्यांनी शक्कल लढवली आहे. 'गाई-म्हशी ...... खरेदी-विक्री' नावाने व्हॉटसअॅप ग्रूप उघडून दहा वीस गावांतील दोन-पाच शेतकरी, दलालांना त्यात जोडुन 'त्या' या ग्रूपवर गुरांचे छायाचित्र पाठवून सौदे केले जात आहे. मात्र एरवी ही गुरे कवडी मोल किंमतीत विक्री होत असून पशुधनाच्या दावणी ऐन पेरणीपूर्व मशागतीच्या तोंडावर रिकाम्या होत असल्याने पशुपालकाला गहीवरून येत आहे.

हेही वाचा: जिगरबाज १०५ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात, खचून न जाता धीराने सामोरे जाण्याचा सल्ला

तूर्तास केवळ दुभत्या जनावरांच्या किंमती कडाडलेल्या आहेत. आठवडे बाजार ऊरुस व जत्रा हे ग्रामीण जीवनशैलीचे महत्त्वाचे अंग समजले जाते. दर आठ दिवसांनंतर ठराविक दिवशी वर्षानुवर्षापासुन भरणाऱ्या बाजाराची शेतकरी, मजुर, कामकऱ्यापासुन व्यापाऱ्यापर्यंत सर्वानाच उत्कंठा लागलेली असते. मात्र सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना महामारीमुळे मराठवाड्यातील प्रसिद्ध असलेल्या पाचोडचा (ता.पैठण) नाव लौकिक असलेला गुरांचा आठवडे बाजार वर्षभरापासुन बंद असल्याने लहान मोठ्या उद्योजकांनी तयार केलेल्या अनेक वस्तू व गाय, म्हैस, बैल, शेळ्या-मेंढ्या आदी जनावरांची खरेदी-विक्री थांबल्यामुळे ग्रामीण अर्थकारणावर त्याचा परिणाम होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थाच कोलमडल्याचे चित्र पाहवयास मिळते. येथे गत पन्नास वर्षापासून भरणारा गुरांचा आठवडे बाजार प्रथमच कोरोनामूळे बारा महिन्यापासून बंद असल्याने आर्थिक व्यवस्थाच ढासळून व्यापारी, पोट व्यापारी, दलाल, पत्रा ठोकणारे, दाखले बनविणाऱ्यावर उपासमारीचा दुर्दैवी प्रसंग ओढवला गेला आहे. या बाजारात नगर, बीड, जालना, औरंगाबादहून व्यापारी गुरे खरेदी-विक्रीसाठी येतात, तर पंचक्रोशीतील शेतकरी आपापली गुरे दावणीला मांडून त्यांच्या विक्रीतून गरजा भागवितात. परंतु यंदाच्या हंगामात प्रथमच ऐन खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या तोंडावर या बाजारात शुकशुकाट पाहावयास मिळते. कोरोना महामारीमुळे ग्रामीण भागाची होरपळ सुरू असतानाच पुन:श्च दुसऱ्या लाटेत ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा समजले जाणारे आठवडे बाजार बंदीमुळे अर्थव्यवस्था पूर्णत: विस्कळीत झाली आहे. यात भाजीपाला, पशुधन या प्रमुख घटकांसह अन्य घटकांच्या माध्यमातून होणारी कोट्यवधी रुपयांची होणारी उलाढाल ठप्प झाली आहे. विशिष्ट प्रकारच्या वस्तूंसाठी आजही येथील आठवडे बाजार प्रसिद्ध आहे. धान्य, पालेभाज्या, पशुधनाच्या उलाढालीवर सुविधा व शिस्तीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने देखरेख ठेवली जाऊन दस्तुरीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला या मिळणाऱ्या करामुळे महसुलात वाढ होण्यास मदत मिळते.

हेही वाचा: ग्रामीण भागात कोरोना रूग्ण वाऱ्यावर, जिल्हा आरोग्य यंत्रणा कोलमडली

मात्र बाजार बंदचा फटका आता त्यांनाही सोसावा लागत असून त्यांना या उत्पन्नाला मुकावे लागत आहे. रोजंदारीवरील मजुरांना श्रमाचा मोबदला बाजाराच्या दिवशी मिळते. या दिवशी परिसरातील निरनिराळ्या गावांचे लोक एकत्र येत असल्याने सामाजिक स्वरूपा च्या देवाण-घेवाणींचे अनेक व्यवहार पार पडतात. अशा पारंपरिक बाजारांना कोरोना महामारीने खीळ घातली आहे. मराठवाड्यातील प्रसिद्ध असलेल्या पाचोड गुरांच्या बाजाराला कोरोनामुळे टाळे लागले असून, गत बारा महिन्यापासून खरेदी विक्रीतून होणारी कोटयावधीची उलाढाल ठप्प झाली आहे. वर्षभरापासून प्रत्येक रविवारी भरणाऱ्या गुरांच्या बाजाराची टाळेबंदी झाली, अन् गुरांच्या खरेदी - विक्री बंदचा फटका शेतकऱ्यांसह ऊसतोड मजुरांनाही बसला आहे. येथील रविवारी भरणाऱ्या या प्रसिद्ध गुरांच्या बाजारात पैठण तालुक्यातील गावांसह गेवराई, अंबड, नगर, शेवगाव, बीड, घनसावंगी आदी ठिकाणाहून जनावरे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतात. दैनंदिन गरजा भागविण्या साठी पशुपालक मोठ्या संख्येने पशुधन येथे विक्रीस आणत असल्याने त्या व्यवहारातून कोट्यावधीची उलाढाल होते. हा बाजार बंद असल्याने ऊसतोड मजुरांचे गणित कोलमडल्याचे पाहावयास मिळते. पैठण तालुक्यातून ऊसतोडमजूर तोडणीसाठी राज्यभर जातात. फेब्रुवारी ते मार्च महिन्यात ते गावी परतात. नेमके याच काळात गुरे खरेदी विक्रीला वेग येतो. मात्र गतवर्षापासून हे गणित कोलमडले आहे. आता ऊसतोड मजुरांना बैलजोडी खरेदीसह विक्रीसाठीही बाजार सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरवर्षी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे या चार महिन्यांत गुरांच्या बाजारात तेजीचे पर्व असते. मात्र यावर्षी कोरोनाने ते ठप्प झाले आहे. एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासूनच रब्बीचे निघालेले उत्पन्न बाजारात आणून शेतकरी खरिपाच्या पेरणीपूर्व तयारीचा बिगुल वाजवितात. त्यातून शेत-शिवारे पुन्हा गजबजून जातात. शेती कसण्यासाठी पिकांच्या उत्पन्नासोबतच पशुधनाची शेतक-यांना चांगली साथ मिळते. खरिपाच्या पेरणी पूर्व मशागतीच्या तयारीला गुरांची खरेदी विक्री करूनच सुरुवात होते. मागील वर्षाप्रमाणेच यावर्षीही कोरोनाने अखंडीत व्यवहाराच्या अर्थव्यवस्थेची साखळी तोडली आहे. शेतकयांचे गुरे खरेदी-विक्रीचे गणित कोरोनामुळे विस्कटले आहे. त्या जनावरांना सोबत घेऊन शेतकऱ्याना खरिपाच्या पुर्वतयारीला आणि पुढे हंगामाला देखील सामोरे जावे लागणार आहे. बाजार बंद असल्याने गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढया आदी जनावरासह शेतीपूरक लघुउद्योग संकटात सापडला आहे. पारंपरिक वस्तु विक्रीस कोरोनाची खिळ बसली असुन वस्तूंची खरेदी-विक्री करण्याचे ठिकाण म्हणजे बाजार, मात्र तेच बंद असल्याने सर्व अर्थव्यवस्थाच कोलमडली जाऊन पशुपालक, व्यापारी, दलाल, पालेभाज्या उत्पादक, पत्रा ठोकणाऱ्या, कासरे -मोरक्या, वेसणी, नाडे, जू, विळे,पासा, लाकडी अवजारे विक्रेत्यावर कोरोनाने उपासमारीचे संकट ओढवले गेले.

हेही वाचा: अंध विद्यार्थ्यांना बोर्डाकडून दृष्टीहिन प्रमाणपत्राची सक्ती, अंधत्व सिद्ध करण्यासाठी धडपड

बैलाच्या आठवडे बाजाराला कोरोनाची लागण होऊन बाजार बंद पडला. ऐन याचवेळी पेरणीपूर्व मशागत तोंडावर आली अन् बाजार बंदमुळे किंमतीत कमालाची घसरण झाली. बाजार बंद असल्याने जनावराचे मोबाईलवर फोटो पाठवून सौदे करावे लागत आहे. एकीकडे बी-बियाण्याची चिंता तर दूसरीकडे कोरोनाच्या लॉक डाऊनचा शेतकरी, पशु पालकवर्गास फटका बसत आहे.

- आफसर पटेल, पशुपालक

ऊसतोडीचा हंगाम आटोपल्याने बैल स्वस्तात मिळतील म्हणुन प्रतिक्षा आहे. मात्र बैलबाजारच बंद असल्याने निराशा होत आहे. गावांतील व्यापाऱ्यांकडे पंचावन्न हजाराला बैलजोडी मागीतली. 'व्हॉटसअॅप'वर आलेल्या फोटोत तफावत जाणवल्याने सहा हजाराने सौदा फ़िसकटला. प्रथमच पाणीटंचाईच्या काळात खरिप पेरणीपूर्व मशागतीच्या तोंडावर बाजार बंद असल्याचे प्रथमच पाहत आहे.

- बाळासाहेब नेहाले, शेतकरी