esakal | ग्रामीण भागात कोरोना रूग्ण वाऱ्यावर, जिल्हा आरोग्य यंत्रणा कोलमडली

बोलून बातमी शोधा

ग्रामीण भागात कोरोना रूग्ण वाऱ्यावर, जिल्हा आरोग्य यंत्रणा कोलमडली
ग्रामीण भागात कोरोना रूग्ण वाऱ्यावर, जिल्हा आरोग्य यंत्रणा कोलमडली
sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : कोरोना विषाणूने संपूर्ण जिल्ह्याला वेढा घातला आहे. त्यात मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागात कोरोना रूग्णांची संख्याही वाढू लागली आहे. अशात जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून ग्रामीण भागातील रूग्णांकडे कानाडोळा होत असल्याचे चित्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. ग्रामीण भागातील रूग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर आरोग्य यंत्रणा त्‍या रूग्णाकडे फिरकण्यास तयार नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रसार थांबणार कसा असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

गतवर्षापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्गाने आपले हातपाय पसरण्यास सुरवात केली आहे. मात्र, गतवर्षी एखाद्या गावात कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्यास जिल्हा आरोग्य यंत्रणा त्या गावात दाखल होऊन त्या रूग्णाला रूग्णालयात दाखल केले जात होते. त्या रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे कोरोना चाचणीसाठी नमुने घेऊन प्रयोगशाळेकडे पाठविले जात होते.

हेही वाचा: जिगरबाज १०५ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात, खचून न जाता धीराने सामोरे जाण्याचा सल्ला

तसेच निर्जंतुतीकरणही केले जात होते. परंतु, यंदा कोरोनाचा पिक पिरेड सुरू असताना ग्रामीण भागात जिल्हा आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात एखादा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या रूग्णांकडे कोणीही फिरकत नसल्याचे चित्र आहे. याचे उदाहरण म्हणजे सहा दिवसांपूर्वी अंबड तालुक्यातील सोनकपिंपळगाव येथील एक व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला. मात्र, मागील सहा दिवसांपासून या रूग्णाकडे किंवा त्या रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीकडे आरोग्य यंत्रणेचा एकही कर्मचारी फिरकला नाही. तसेच तो रूग्ण रूग्णालयात दाखल झाला आहे का? त्या रूग्णाने उपचार घेतले आहेत का? त्यांच्या संपर्कातील व्यक्तीची कोरोना चाचणी केली आहे का? याची साधी विचापूस ही आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे सुखापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला या रूग्णासंदर्भात माहिती नव्हती. हीच परिस्थिती ग्रामीण भागातील अनेक कोरोना रूग्णांसंदर्भात आहे.

त्यामुळे आरोग्यमंत्री ग्रामीण राजेश टोपे यांच्या जिल्ह्यातील भागातील आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे चित्र पाहण्यास मिळाले आहे. परिणामी ग्रामीण भागातील कोरोना रूग्ण वाऱ्यावर असल्याने कोरोना संसर्गाचा प्रसार होत असून रूग्ण संख्येत वाढ आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केवळ लाॅकडाउन करून भागणार नाही, तर प्रत्येक कोरोनाबाधित रूग्णांवर उपचारासह त्याच्यावर देखरेख ठेवणेही तेवढेच महत्‍वाच आहे. यामुळे होणारा प्रसार रोखण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा: अंध विद्यार्थ्यांना बोर्डाकडून दृष्टीहिन प्रमाणपत्राची सक्ती, अंधत्व सिद्ध करण्यासाठी धडपड

कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आल्यानंतर रूग्णांची यादी त्या-त्या भागातील आरोग्य यंत्रणेला पाठविली जाते. त्यामुळे यंत्रणेतील सर्वांना कोरोना रूग्णांची माहिती मिळते. ग्रामीण भागातील कोरोना रूग्णांची जबाबदारी ही जिल्हा परिषदेची आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांवर उपचारासह त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचण्या संदर्भातील त्रूटी पूर्ण करण्याच्या आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.

- रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी, जालना.